भुसावळात एक हजार उमेदवारांनी दिली परीक्षा

0

भुसावळातील रेल्वेच्या पटांगणावर ऑल इंडीया आरपीएफ फौजदार भरती प्रक्रियेला शांततेत सुरुवात ; भरती प्रक्रियेवर सीसीटीव्हीची नजर ; आजही दिवसभर चालणार प्रक्रिया

भुसावळ- शहरातील रेल्वेच्या मैदानावर रविवारपासून ऑल इंडीया आरपीएफ फौजदार पदासाठी उमेदवार भरती प्रक्रियेला कडेकोट बंदोबस्तात व सीसीटीव्हीच्या निगराणीखाली सुरुवात झाली. सोमवारीदेखील ही प्रक्रिया राबवण्यात येणार असून पहिल्या दिवशी रविवारी हजारावर उमेदवारांनी परीक्षा दिली. आरपीएफ उपनिरीक्षक पदासाठी अर्ज केलेल्या उमेदवारांसाठी शारीरीक चाचणीची परीक्षा तसेच कागदपत्रांची येथे तपासणी केली जात आहे.

बारकाईने कागदपत्रांची तपासणी
उपनिरीक्षक पदासाठी पहिल्या दिवशी एक हजार महिला-पुरूषांनी हजेरी लावली तर पहाटे सहा वाजेपासून उमेदवार पटांगणावर हजर झाल. इच्छूक उमेदवारांच्या कागदपत्रांची तपासणी स्कॅनरद्वारे करण्यात आली. भरती प्रकियेसाठी आदल्या दिवशी रात्रीच शनिवारी उमेदवार शहरात दाखल झाले होते. याप्रसंगी आरपीएफचे वरीष्ठ अधिकारी तसेच कर्मचार्‍यांचा कडेकोट बंदोबस्त असल्याने बाहेरच्या कुणालाही प्रवेश देण्यात आला नाही.

आज दिवसभर चालणार प्रक्रिया
रविवारप्रमाणेच सोमवारीदेखील उमेदवारांची शारीरीक चाचणी तसेच कागदपत्रांची तपासणी केली जाणार असल्याचे सांगण्यात आले. सुमारे दोन हजार उमेदवार ही परीक्षा देत असून त्यानंतर भरतीचा रीझल्ट जाहीर केला जाणार आहे. मध्यप्रदेश, महाराष्ट्र, गुजराथ आणि बिहार या चार राज्यातील उमेदवार भरतीसाठी दाखल झाले आहेत.

निवडीकडे लागले उमेदवारांचे लक्ष
महिला उमेदवारांना 800 मीटर तर पुरूष उमेदवारांना 1600 मीटर अंतर धावण्यासाठी अंतर देण्यात आले होते तसेच हायजंम्प, लॉग जंम्प आदी दिव्यातून उमेदवारबाहेर पडले. त्यानंतर रविवारी व सोमवारी वजन, उंची, छाती मोजण्यासह कागदपत्रांची बारकाईने तपासणी होणार असून या सर्व दिव्यातून बाहेर पडल्यानंतर कुणाची निवड होते? याकडे उमेदवारांचे लक्ष लागले आहे.