भुसावळ- रेल्वेच्या एलएचबी कोचेससाठी भुसावळात पीओएच वर्कशॉप उभारणीचा प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे सादर करण्यात आला असून या प्रकल्पाला रेल्वे महाव्यवस्थापकांनी मंजुरी दिली आहे. 472.14 कोटी रुपयांचा हा प्रकल्प असून या संदर्भात मध्य रेल्वेच्या सीएसएटी मुख्यालयातील प्रधान मुख्य यांत्रिक अभियंता (नियोजन विभाग) मनोज जोशी यांनी, रेल्वे बोर्डाचे नवी दिल्ली येथील कार्यकारी संचालकांना (प्रकल्प) गुरूवार, 6 रोजी पत्र दिले. यापुर्वी हा प्रकल्प नागपुरात उभारण्याचे नियोजन होते. त्यासाठी 30 ऑक्टोबर 2018 रोजी रेल्वे बोर्डाकडे प्रस्ताव सादर केला होता मात्र नागपुरात प्रकल्पासाठी जागा उपलब्ध नव्हती तसेच पुणे आणि मुंबई येथील एलएचबी कोचेसचे पीओएच भुसावळात करणे नागपूरच्या तुलने अधिक सोयीचे आहे. तसेच भुसावळात प्रकल्पासाठी पुरेशी जागा उपलब्ध असल्याने नागपूरऐवजी भुसावळात प्रकल्प साकारला जाणार आहे. या प्रस्तावाला मध्ये रेल्वेच्या महाव्यवस्थापकांनी मंजुरी दिली आहे. दरम्यान, भुसावळात रेल्वेची जागा असल्याने हा प्रकल्प केवळ 472.14 कोटीत साकारला जाईल. त्यामुळे रेल्वेचे 35.5 कोटी वाचणार आहेत.