भुसावळ । शहरातील जामनेर रोडलगत असलेल्या कुंटणखान्यावर पोलिसांनी अचानक धाड टाकून देहविक्री करणार्या 35 महिला व 5 अल्पवयीन मुलींसह 22 पुरुषांना ताब्यात घेण्याची कारवाई सोमवारी सायंकाळी केली. यामुळे शहरातील गुन्हेगारांमध्ये खळबळ उडाली. गंभीर गुन्ह्यांमधील आरोपी या भागात आश्रयाला थांबत असल्याने अनेक वादांचे कारण ही वस्ती ठरते.
तक्रारी वाढल्यावर पोलिसांची कारवाई
शहरातील देहविक्रीच्या व्यवसायासंदर्भात पोलिसांकडे तक्रारी आल्यामुळे अप्पर पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील व उपविभागीय पोलीस अधिकारी निलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली पथक नियुक्त करुन सायंकाळी अचानक जामनेर रोडलगतच्या दीनदयालनगर परिसरातील कुंटणखान्यावर धाड टाकण्यात आली. पोेलीसांनी 35 महिला, 5 अल्पवयीन मुलींसह 22 पुरुषांना अटक केली. या कारवाईमध्ये 26 महिला पोलीस कर्मचारी, स्थानिक गुन्हे शाखेचे पथक, एसडीपीओ पथक सहभागी होते. विशेष म्हणजे उपविभागीय पोलीस अधिकारी निलोत्पल यांनी स्वत: या परिसरात पाहणी केली. बाजारपेठ पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक साबळे, सपोनि पवार हजर होते. या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. जामनेररोड परिसरातील या भागात विविध गुन्ह्यांतील फरार गुन्हेगारांचे वास्तव्य असल्यामुळे पोलीसांनी ही कारवाई केली असल्याचे समजते. रात्री उशिरापर्यंत बाजारपेठ पोेलीस स्थानकात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरु होती.