अप्रिय घटनेपूर्वीच बाजारपेठ पोलिसांनी आवळल्या मुसक्या ; शेरूअलीसह सादीक अली जाळ्यात
भुसावळ- शहरातील वाढत्या चोर्या-घरफोड्यांच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठ पोलिसांनी शनिवारी मध्यरात्री शहरात कोम्बिंग ऑपरेशन राबवून चोरीच्या प्रयत्नात असलेल्या दोघा चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या. आरोपींच्या ताब्यातून लोखंडी आसारी तसेच हॅक्सा ब्लेड जप्त करण्यात आले. सादीक उर्फ आय्या न्याआज अली (21, पापा नगर, भुसावळ) व शेरूअली सल्तनतअली ईराणी (23, पापा नगर, ईराणी झोपडपट्टी, भुसावळ) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. दरम्यान, शेरूअलीविरुद्ध खंडवा लोहमार्ग पोलिसात मोबाईल चोरीचा गुन्हा दाखल असल्याने त्याचा खंडवा लोहमार्ग पोलिसांनी शनिवारी सायंकाळी ताबा घेतला.
पोलिसांच्या कोम्बिंगमध्ये आवळल्या मुसक्या
बाजारपेठ पोलिस ठाण्याचे निरीक्षक देविदास पवार यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक दत्तात्रय गुळींग, उपनिरीक्षक अनिस शेख, हवालदार माणिक सपकाळे, सुनील जोशी, सुनील थोरात, श्रीकृष्ण देशमुख, गुलबक्ष तडवी, विकास सपकाळे, दिनेश कापडणे, समाधान पाटील आदींनी बाजारपेठ हद्दीत शनिवारी रात्री एक वाजेच्या सुमारास बाजारपेठ पोलिस ठाणे हद्दीत कोम्बिंग राबवले. बसस्थानकाजवळील पार्सल कार्यालयाजवळून शेरूअली ईराणीच्या मुसक्या आवळण्यात आल्या तर अप्सरा साडी सेंटरजवळ संशयास्पदरीत्या थांबून असलेल्या सादीक अलीच्या मुसक्या आवळण्यात आल्या. आरोपींविरुद्ध भादंवि 122 प्रमाणे कारवाई करण्यात आली.