भुसावळ : कोरोनाच्या पार्श्वभूमी वर भुसावळ येथील खाजगी रूग्णालये बंद असल्याच्या तक्रारी वारंवार येत होत्या. त्यावर पालकमंत्र्यांना दवाखाने सुरू करण्याच्या सूचना दिलेल्या होत्या तसेच याबाबत जिल्हाधिकारी व तहसीलदार यांनी देखील आदेश दिले होते. या पार्श्वभूमीवर काही रुग्णांना मात्र रुग्णसेवेचा सुखद अनुभव देखील येत आहे. अशीच एक घटना 13 मे रोजी भुसावळात निदर्शनास आली. जळगाव जामोद येथील एक 27 वर्षाची तरुण रुग्ण अपेंडिक्सच्या विकाराने त्रस्त होती. अनेक दिवस गोळ्या-औषधी घेऊन देखील आराम पडत नव्हता आणि परीसरात ऑपरेशन होऊ शकत नव्हते त्यामुळे मजल दरमजल करीत भुसावळ येथे विश्वनाथ हॉस्पिटलमध्ये पोहोचली. तिथे डॉ.विनायक महाजन यांनी तिच्यावर अत्यावश्यक म्हणून शस्त्रक्रिया केली परंतु दुपारी चार वाजता रुग्णाची प्रकृती अत्यवस्थ झाल्याने त्यांनी भूलतज्ञ डॉ.संज्योत पाटील आणि औषधवैद्यकशास्त्रतज्ञ डॉ. दीपक जावळे यांना मदतीला बोलाविले. रुग्णाचा जीव वाचणे महत्वाचे आहे हे लक्षात घेऊन दोन्ही डॉक्टर लॉकडाऊन असतानादेखील काही क्षणात विश्वनाथ हॉस्पिटलला हजर झाले आणि त्यांनी तीन तास प्रयत्नाची पराकाष्ठा केली आणि एका तरुण पेशंटचा प्राण वाचला.
अन्य रुग्णांनाही सुखद अनुभव
14 मे रोजी डॉ.वीरेंद्र झांबरे यांच्या प्रतिभा हॉस्पिटलमध्ये पोटातील गोळ्यामुळे असह्य वेदना होत असलेल्या 55 वर्षीय महिलेवर यशस्वी शस्त्रक्रिया पार पडली. याच दिवशी डॉ.प्रदीप फेगडे यांच्या मुक्ताई हॉस्पिटलमध्ये एका नवजात अर्भकावर एनआयसीयुमध्ये उपचार करण्यात आले. नव्याने सुरु झालेल्या रीदम हॉस्पिटलमधील अतिदक्षता विभागात दररोज किमान 3 ते 4 अत्यवस्थ रुग्णांवर उपचार होत आहेत. डॉ.प्रसन्ना जावळे यांच्या पुष्पा हॉस्पिटलमध्येदेखील अत्यावश्यक शस्त्रक्रिया सुरू असल्याचे आढळून आले. डॉ.प्रवीण महाजन आणि इतर पॅथॉलोजी लॅबोरेटरी आणि बहुतेक सर्व सोनोग्राफी सेंटरमध्ये रुग्णांची तपासणी होत आहे. शहरातील बहुतांशी स्त्री रोग तज्ज्ञांकडे प्रसुती आणि गरोदर रुग्णांवर अत्यावश्यक उपचार होत आहेत. तर अस्थिरोगतज्ञ अपघातातील रुग्णांवर नियमित उपचार करीत असल्याची माहिती देखील समोर आली. भुसावळ येथील नगरसेवक पिंटू कोठारी काही दिवसांपूर्वी एका रक्तबंबाळ मुलाला डॉ.किरण झांबरे यांच्या दवाखान्यात घेऊन गेले असता त्यांनादेखील याचा अनुभव आला. जमेल त्या प्रकाराने दवाखाने सुरू ठेवण्याचा प्रयत्न होत आहे. मात्र काही वेळा दवाखाने बंद राहतात यात प्रामुख्याने अपुरे मनुष्यबळ आणि अपुरी साधन सामुग्री अशी कारणे आहेत. बहुतेक सर्व दवाखान्यात कर्मचार्यांना हिवासाची सुविधा नाही ते घरून ये-जा करणारे आहेत. भुसावळमध्ये अनेक प्रतिबंधित क्षेत्रे आहेत यामुळे महत्वाचे मुख्य रस्ते बंद आहेत तर अनेक पर्यायी छोटे रस्ते स्थानिक रहिवाशांनी बांबू आणि पत्रे लाऊन कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद केले आहेत. त्यामुळे बर्याच वेळा कर्मचारी कामावर येऊ शकत नाहीत तसेच हॉस्पिटल मध्ये दैनंदिन देखभालीच्या वस्तूंचा पुरवठा जसे ऑक्सिजन सिलेंडर, जनित्रासाठी लागणारे डीझेल, साफसफाईच्या वस्तू आउदीलॉकडाऊन मुळे नियमित उपलब्ध होत नाहीत आणि पर्यायाने काही वेळा हॉस्पिटल बंद ठेवावे लागते ही बाबदेखील समोर आली आहे.