भुसावळ : कोरोनावर मात केल्यानंतर जळगाव जिल्ह्यातील 21 नागरीकांना प्रशासनाने डिस्चार्ज दिला तर रविवारी सायंकाळी हे लोक आपापल्या घरी परतले. भुसावळ शहरातीलदेखील सात नागरीकांचा यात समावेश असून रविवारी रात्री नागरीक शहात परतल्यानंतर सिंधी कॉलनीसह अन्य परीसरात त्यांचे नागरीकांचे स्वागत केले. शहरातील जामनेर रोडवरील सिंधी कॉलनीतील 40 वर्षीय नागरीकही रात्री साडेनऊ वाजता आपल्या कॉलनीत परतल्यानंतर नागरीकांनी उत्स्फूर्तपणे टाळ्या व डमरू तसेच थाळ्या वाजवून तसेच फुलांची उधळण करून या नागरीकाचा उत्साह वाढवला. याप्रसंगी प्रकाश बत्रा, राजकुमार वाधवाणी, सुरेश अंबाणी, नवीन कुकरेजा, सनी दर्डा, उमेश हसरानी तसेच सिंधी कॉलनीतील नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
भुसावळातील सात रुग्णांची कोरोनावर मात
शहरात 25 एप्रिलला समता नगरात पहिली महिला रुग्ण आढळून आली होत तर 27 एप्रिल रोजी समता नगरात दवाखाना असलेल्या व पहिल्या महिला रुग्णावर उपचार करणारे डॉक्टर बाधीत झाले होते तसेच 28 एप्रिलला रोजी सिंधी कॉलनीतील पालिका कर्मचारी व डॉक्टरदेखील बाधीत असल्याचे स्पष्ट झाले होते. या पाठोपाठ 30 एप्रिलला शांती नगरातील डॉक्टरांची पत्नी व त्यांचा 15 वर्षीय मुलगा बाधीत झाला होता. यानंतर पंचशील नगरातील महिलाही बाधीत झाली होती. या सात रुग्णांवर जळगावच्या कोविड रुग्णालयात उपचार करण्यात आल्यानंतर त्यांना लक्षणे किंवा काही त्रास नसल्याने रविवारी डिस्चार्ज देण्यात आला. रुग्णवाहिकेने रात्री त्यांना भुसावळातील राहत्या घरापर्यंत सोडण्यात आले. दरम्यान, प्रकृतीत सुधारणा झालेल्या रुग्णांचे भुसावळात आगमन झाल्याने टाळ्या वाजवून स्वागत करण्यात आले तर सर्व रुग्णांना सात दिवसांसाठी क्वारंटाइन करण्यात आले आहे. त्यांच्या हातावर शिक्के मारुन त्यांना सात दिवसांची औषधे सोबत देण्यात आली आहेत. या रुग्णांना घराबाहेर पडू नये या संदर्भात संबंधितांना सूचना देण्यात आल्या आहेत.