भुसावळात कोरोना संसर्ग विलगीकरणासाठी तीन रुग्णालयात सोय

0

शहरातील भाजी बाजार केला बंद : नागरीकांनी घराबाहेर न पडण्याचे आवाहन

भुसावळ : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभुमीवर विलगीकरणासाठी प्रशासनाकडून तयारी करण्यात आली असून यासाठी पालिका दवाखाना, रेल्वे हॉस्पीटल आणि चैतन्य हॉस्पीटल येथे व्यवस्था करण्यात आली आहे. सुमारे 150 रूग्णांची व्यवस्था येथे करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. दरम्यान, गर्दी टाळण्यासाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर मैदानावर भाजी पाल्याचा लिलाव करण्याच्या सूचना शनिवारच्या बैठकीत प्रांताधिकार्‍यांनी केल्या. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभुमीवर संचारबंदी असतांनाही अनेक जण बाहेर फिरत आहे, त्यांनी गांभीर्य लक्षात घेऊन घरातच बसावे, कोणीही बाहेर पडू नये असे आवाहन प्रांताधिकारी रामसिंग सुलाणे यांनी केले आहे.

सोशल डिस्टन्स पाळण्याचे आवाहन
शहरातील बाजारात भाजीपाला घेण्यासाठी नागरिकांची होत असलेली गर्दी लक्षात घेता सोशल डिस्टन्सिंग पाळले जात नाही, यासाठी शहरात भरत असलेला भाजी बाजारच तेथून बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शहरातील प्रशासनाकडून टीव्ही टॉवर, खडकारोड पालिका शाळा, भुसावळ हायस्कूल, गडकरी नगर येथे भाजी बाजार भरणार आहे, तेथूनच भुसावळकरांनी सोशल डिस्टन्सिंग ठेवून भाजी पाला खरेदी करायचा आहे. डेली बाजारात कोणीही विक्रेता रविवारपासून भाजी विक्रीसाठी बसणार नाही, तेथे जर कोणी बसले तर त्यांच्यावर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे. डीवायएसपी गजानन राठोड, तहसीलदार दीपक धिवरे, मुख्याधिकारी करूणा डहाळे, पोलिस निरीक्षक दिलीप भागवत, निरीक्षक बाबासाहेब ठोंबे, गटविकासा अधिकारी विलास भाटकर यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी बैठकीला उपस्थित होते.

भुसावळातील लोकोपायटच्या मृत्यूनंतर प्रशासनाला अहवालाची प्रतीक्षा
भुसावळातील लोको पायलट यांचा हृदयविकाराने शुक्रवारी रात्री मृत्यू झाला असलातरी या रुग्णाची हिस्ट्रीचे अवलोकन केल्यानंतर रुग्णासह त्यांच्या परीवारातील सदस्यांचे नमुने घेण्यात आले असून त्याचा अहवाल येण्यास 48 तासाचा अवधी लागत असून सोमवारपर्यंत अहवाल येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. भुसावळकरांनी स्वत:ची काळजी घ्यावी, कोणीही घराबाहेर पडू नये, भाजीपाला घेण्यास जाणार्‍यांनी तोंडाला मास्क लावून बाहेर पडावे, असे आवाहन प्रांत सूलाणे यांनी केले आहे.