भुसावळात कौटुंबिक कलहातून तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

0

शिवाजी नगरातील रक्ताच्या सड्याचा अखेर उलगडा ; पित्याला मारहाण केल्यानंतर तरुणाने स्वतःच पायावर मारले ब्लेड

भुसावळ- शहरातील शिवाजी नगरातील एस.के.ऑईल मिलजवळील रहिवासी असलेल्या शेख असलम यांच्या घराबाहेर पडलेल्या रक्ताच्या सड्याचा उलगडा करण्यात बाजारपेठ पोलिसांना अखेर यश आले आहे. खामगाव येथील मूळ रहिवासी असलेल्या सध्या गांधी नगरातील भाड्याने राहणार्‍या तरुणाने मद्याच्या नशेत वडीलांना मारहाण केल्यानंतर वैफल्यग्रस्त अवस्थेत स्वतःच्या पायाच्या पोटरीवर ब्लेड मारहाण केल्यानंतर शिवाजी नगर गाठल्याची माहिती पुढे आली आहे. पहाटे शुद्धीत आल्यानंतर प्रकरण अंगाशी येईल म्हणून या तरुणाने शहरातून काढता पाय घेत अकोल्यातील सरकारी रुग्णालयात उपचारासाठी आसरा घेतल्याची पोलिसांनी दिली.

रक्ताच्या सड्यामुळे पोलिसांचाही वाढला होता ताण
शहरातील शिवाजी नगरातील एस.के.ऑईल मिलसमोर अज्ञाताचा खून झाल्याची शनिवारी सकाळी जोरदार चर्चा होती मात्र प्रत्यक्षात बाजारपेठ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतल्यानंतर प्रत्यक्षात असे काहीही घडले नसल्याचे निष्पन्न झाले होते तर घटनास्थळी मात्र शेख असलम यांच्या घराबाहेर मोठ्या प्रमाणावर रक्ताचे डाग आढळले होते शिवाय शेख यांच्या घरापासून सुमारे दोनशे मीटरपर्यंत रक्ताचे थेंब आढळल्याने विविध तर्क-वितर्क लढवण्यात येत होते. शनिवारी सकाळी ही घटना उघडकीस आल्यानंतर बाजारपेठ पोलिस ठाण्याचे निरीक्षक देविदास पवार, जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक मनोज पवार, एएसआय अंबादास पाथरवट यांच्यासह बाजारपेठ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. घटनास्थळापासून सुमारे 200 मिटरपर्यंत रक्ताचे डाग पोलिसांना आढळल्याने पोलिसांनी त्या जागेवर खडूने मार्किंगही केले होते.

कौटुंबिक कलहातून मद्याच्या नशेत केले कृत्य
शिवाजी नगरातील घटनेचा उलगडा करण्यासाठी बाजारपेठ पोलिसांनी संपूर्ण परीसरात विचारणा केल्यानंतर कामधंद्यानिमित्त प्रमोद उर्फ पन्ना देविदास भानुरे (28, खामगाव, जि.बुलढाणा) हा तरुण आपल्या आई-वडीलांसह चा महिन्यांपूर्वी शहरातील गांधी नगरात आपला भाचा मयुर सुरेश लोखंडे यांच्या शेजारी रहावयास आल्याची माहिती मिळाली शिवाय हा तरुण काही कामधंदा करीत नसल्याने व त्यास दारूचे व्यसन जडल्याने शनिवारी मध्यरात्री त्याने वडिलांशी भांडण करीत त्यांना मारहाण करीत घर सोडले. वैफल्यग्रस्त अवस्थेत त्याने आपल्या पायाच्या पोटरीवर ब्लेडने वार केल्याने मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव झाला. पहाटेपर्यंत हा तरुण या जागेवरच पडून होता. पहाटे त्याच्या आईने त्याचा शोध घेतल्यानंतर हे प्रकरण पोलिसात जायला नको म्हणून त्यास अकोला येथे उपचारार्थ हलवण्यात आले. अकोला येथील सरकारी रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू असल्याचे मयुर लोखंडे याने पोलिसांना दिलेल्या जवाबात म्हटले आहे. याबाबत तक्रार आली नसल्याने गुन्हा दाखल झाला नसल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले.