रीअॅक्टर बुशींगचा स्फोट ; तीन तासांनी आगीवर नियंत्रण ; आगीच्या कारणाचा शोध
भुसावळ- तालुक्यातील खडका गावातील महापारेषणच्या 400 केव्ही क्षमतेच्या सबस्टेशनला आग लागल्याने सुमारे पाच कोटींवर नुकसान झाले. तब्बल तीन तासांच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवता आले. दरम्यान, वीज दाब नियंत्रणात ठेवण्यासाठीच्या रीअॅक्टर या उपकरणातील बुशींगचा स्फोट झाल्याने आग लागल्याचे सूत्रांनी सांगितले. दरम्यान, या घटनेनंतर कोराडी येथून जोडणी होणारी 400 केव्हीची वीज वाहिनी शटडाऊन करण्यात आली तर सुदैवाने जिवितहानी टळली.
ऑईल यार्डात पसरल्याने आगीचा भडका
महापारेषणच्या खडका येथील 400 केव्ही क्षमतेच्या सबस्टेशनमध्ये गेल्या दोन दिवसांपूर्वी पश्चिमेकडील भागात असलेले रीअॅक्टर हे उपकरण काढून पूर्वेकडे बसविण्यात आले होते. शनिवारी सकाळी रीअॅक्टरची यशस्वी चाचणी करण्यात आली तर सकाळी 11 वाजेच्या दरम्यान ते पूर्ववत कार्यरत झाले मात्र अचानक दुपारी 2 वाजून 38 मिनिटांनी मोठा कर्णकर्कश आवाज झाला. रीअॅक्टरमधील बुशींग फुटून आग लागली. आगीचे रौद्ररुप कमी वेळेतच वाढत गेले. ट्रान्सफार्मर प्रमाणे रीअॅक्टरमध्येही ऑईल असल्याने पेटते ऑईल सबस्टेशनच्या यार्डात पसरले. यामुळे सबस्टेशनमधून कंट्रोल रुमला जोडणी झालेल्या केबलनेही पेट घेतला. दुपारी तीन वाजेदरम्यान दीपनगर औष्णिक केंद्र, भुसावळ नगरपालिका, फैजपूर व सावदा नगरपालिकेच्या अग्निशमन बंबांनी आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले. महापारेषणच्या खडका कार्यालयात असलेल्या फायर एक्सट्युजन्सच्या मदतीनेही आगीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न झाला. मात्र केबल पेटल्याने तब्बल तीन तासांनी अर्थात सायंकाळी साडेपाच वाजेच्या दरम्यान आग नियंत्रणात आली. या घटनेमुळे कोराडी येथून खडक्याला जोडण्यात आलेल्या 400 केव्हीची वीजवाहिनी ठप्प झाली आहमहापारेषणच्या रिअॅक्टरला आग लागल्याने सबस्टेशनमधील ट्रेंच (केबल वहनासाठी केलेले खड्डे) ला देखील आग लागली. वीजपुरवठा खंडीत केल्यानंतर अग्निशमन बंबांतून ट्रेंचमध्ये पाणी ओतून आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले. यामुळे नुकसानाचे प्रमाण वाढले. दरम्यान, खडका सबस्टेशनमधील आग कोणत्या कारणाने लागली? काय तांत्रिक बिघाड झाला? याचा वरिष्ठ पातळीवर शोध घेतला जाणार आहे. आगीची माहिती मिळताच खडका केंद्राचा पदभार असलेले सुप्रीटेंडेंट इंजिनिअर जगन्नाथ चुडे यांनी नाशिक तर कार्यकारी अभियंता अनुपम बढेला यांनी नागपूर येथून खडक्याकडे धाव घेतली. सबस्टेशनचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता विवेक नेहेते यांनी घटनास्थळी आपत्तीनिवारण व पुढील धोके टाळण्यासाठी मार्गदर्शन केले.