मोकाट श्वान आणि गुरांचाही ठरतोय वाहनधारकांना अडसर
भुसावळ- शहर आणि महामार्गावर पावसाच्या पाण्यामुळे लहान आकाराचे खड्डे मोठा आकार घेत असल्याने वाहनधारकांची खड्डे चुकवतांना अपघाताच्या भीतीने तारांबळ उडत असतानाही रस्त्यावर ठाण मांडून असलेल्या मोकाट गुरांसह श्वानांमुळे वाहनधारक त्रस्त झाले आहेत. वर्षानुवर्षे मोकाट गुरांवर पालिकेकडून कारवाई करण्याबाबत केवळ वल्गनाच होत असल्याने वाहनधारकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. आधीच शहरातील प्रमुख रस्त्यांसह अंतर्गत रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे वाहनधारकांची हाडे खिळखिळी झाली असताना मोकाट गुरांसह श्वानांचा उपद्रव वाढला आहे. दरम्यान, महामार्ग प्राधीकरण विभाग तसेच शहरातील रस्त्यांसाठी पालिका प्रशासनाने पुढाकार घेवून वाहनधारकांना दिलासा देण्याची मागणी होत आहे.
मोकाट गुरांचे रस्त्यावर बस्तान
शहरात वाहतुकीच्या मार्गावर व नागरी वसाहतीमध्ये मोठ्या प्रमाणात मोकाट श्वानाचा वावर वाढला आहे तसेच काही मोकाट गुरे वाहतुकीच्या मार्गावरच बस्तान मांडत असल्याने वाहनधारकांना मार्गक्रमण करतांना अडचणीचे ठरत आहे तर रस्त्यावरील मोकाट गुरांच्या बस्तानामुळे वाहतूक कोंडीचाही प्रश्न निर्माण होत असल्याने वाहनधारकांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे.
मोकाट श्वानांचा बंदोबस्त व्हावा
शहरातील वाहतुकीच्या मार्गावर मोकाट श्वान व गुरांचा अडसर ही शहरवासीयांसाठी डोकेदुखी ठरली आहे. रात्रीच्या वेळेस तर मोकाट श्वान वाहनधारकांच्या मागे धावत असल्याने वाहनधारकांमध्ये गोंधळ निर्माण होतो. यामुळे त्यांचा वाहनावरील ताबा सुटुन अपघाताच्या घटनांना सामोरे जावे लागत असून काही वाहनधारकांना आपला जीवदेखील गमावावा लागला आहे. यामुळे पालिका प्रशासनाने याची त्वरीत दखल घेणे अत्यावश्यक झाले आहे.
व्यापारी संकूले व सार्वजनिक ठिकाणीही उपद्रव
मोकाट गुरांचा बसस्थानक, रेल्वेस्थानक, व्यापारी संकूले, बाजारपेठ अशा ठिकाणीही मोठ्या प्रमाणात वावर वाढला असून त्यांच्या विष्ठेमुळे दुर्गंधी पसरते. यामुळे व्यापारी संकुलातील व्यावसायीक व ग्राहक तसेच बसस्थानक, रेल्वे स्थानकावरील नागरीकांना त्रास सहन करावा लागत असल्याने नाराजी व्यक्त होत आहे.
पालिकेची केवळ आश्वासने
शहरातील वाहतुकीला अडथळा निर्माण करणार्या व शहरातील रहिवासी भागातील नागरीकांना त्रासदायक ठरत असलेल्या मोकाट गुरांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी वारंवार केली जात आहे. मात्र पालिका प्रशासनाकडून केवळ आश्वासने दिली जात असल्याने शहरात मोकाट गुरांची व श्वानांची दिवसेंदिवस वाढत आहे. यामुळे पालिकेच्या कारभाराविषयी शहरवासी व वाहनधारकांमध्ये तीव्र स्वरूपाची नाराजी व्यक्त केली जात आहे.
खड्डेमय रस्त्यांना डागडूजीची गरज
शहरातील विविध भागातील वाहतुकीच्या मार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे निर्माण झाले आहेत. यामुळे अशा खड्डेमय मार्गावरून वाहनधारकांना मार्गक्रमण करतांना तारेवरची कसरत करावी लागत असल्याने नाराजी व्यक्त होत आहे तसेच शहरातील खड्डे चुकवतांना वाहनधारकांना किरकोळ स्वरूपाच्या अपघाताच्या घटनांना व वादाला सामोरे जावे लागत आहे. यामध्ये बसस्थानक चौक परीसर, जाम मोहल्ला ते खडका रोड, जामनेर रोड मामाजी टॉकीज रोड, जळगाव रोड, यावल रोड अशा विविध भागातील मार्ग खड्डेमय झाले आहेत. यामुळे पालिका प्रशासनाने या प्रकरणाची दखल घेवून शहरातील खड्डेमय झालेल्या मार्गाची तात्पुरत्या स्वरूपात दुरूस्ती करून वाहनधारकांना दिलासा देण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.