अडचणीच्या काळात एजंटांना लोकसभेत आवाज उठवून मिळवून दिला न्याय
भुसावळ- पोस्टातील आठ लाख अल्प बचत एजंटांबाबत लोकसभेत प्रश्न मांडून त्यांना न्याय मिळवून देणार्या रावेर लोकसभेच्या खासदार रक्षा खडसे यांचा शनिवारी शहरातील अग्रसेन भवनात विशेष सत्कार करण्यात आला. प्रसंगी आमदार संजय सावकारे यांची प्रमुख उपस्थिती होती. केंद्र सरकारने गत वर्षी काही योजना बंद करून कमिशनही कमी झाल्याने आठ लाख एजंटांवर बेरोजगारीची कुर्हाड कोसळली होती शिवाय या एजंटांमध्ये महिलांचे लक्षणीय प्रमाण असल्याने अल्प बचत एजंटांनी नवी दिल्लीत 18 ते 20 डिसेंम्बर दरम्यान ‘भीक मांगो’ आंदोलन केले गेले. शिष्टमंडळाने खासदार खडसे यांची भेट आपले प्रश्न मांडल्यानंतर खडसे यांनी मंत्री महोदयांना विनंती करून एजंटांच्या समस्या सोडवण्यासंदर्भात शिफारस केली होती. यावर सरकारने सकारात्मक भूमिका घेत पोस्टल एजंट्सचा प्रश्न सोडवला होता. प्रसंगी राष्ट्रीय अल्पबचत एजंट्सचे राष्ट्रीय अध्यक्ष पृथ्वीश भट्टाचार्य यांनी पाठवलेला संदेश वाचून दाखवण्यात आला. दरम्यान, शनिवारी शहरात झालेल्या अल्पबचत एजंटांच्या मेळाव्यास अमदार संजय सावकारे, पंचायत समिती सभापती प्रीती मुरलीधर पाटील, महाराष्ट्र राज्य अल्पबचत गट अध्यक्ष पी.जी.पाटील, अल्पबचत गट जिल्हाध्यक्ष अनिल काळे आदी उपस्थित होते.