भुसावळ : शहरातील एका संशयीताकडे गावठी कट्टा असल्याची गोपनीय माहिती जळगाव गुन्हे शाखेला मिळाल्यानंतर पथकाने सापळा रचून आरोपीला अटक केली. आरोपीच्या ताब्यातून 15 हजार रुपये किंमतीचा गावठी कट्टा व 15 हजार रुपये किंमतीची दुचाकी जप्त करण्यात आली आहे. आरोपी सोबत अन्य एक अल्पवयीन संशयीतदेखील असल्याने त्यास ताब्यात घेण्यात आले. तुषार सतीश जाधव (20, सोनिच्छावाडी, जामनेर रोड, भुसावळ) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.
गोपनीय माहितीवरून आवळल्या मुसक्या
शहरातील पंचमुखी हनुमान मंदिराजवळून आरोपी तुषार सतीश जाधव (20, सोनिच्छावाडी, जामनेर रोड, भुसावळ) हा दुचाकी (एम.पी.68 एम.डी.9802) वरून आल्यानंतर त्याच्या पथकाने मुसक्या आवळल्या तर आरोपी सोबत अन्य एक अल्पवयीन संशयीत असल्याने त्यासही चौकशीकामी ताब्यात घेण्यात आले. बुधवारी सायंकाळी साडेपाच वाजता ही कारवाई करण्यात आली. आरोपीविरुद्ध शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. शहरात आतापर्यंत सहा कट्टे जप्त करण्यात आले असून बुधवारच्या कारवाईत पुन्हा कट्टा जप्त झाल्याने शहरात खळबळ उडाली आहे. ही कारवाई जळगाव गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक बी.जी.रोहोम यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय स्वप्नील नाईक, हवालदार रवींद्र पाटील, कमलाकर बागुल, नाईक दादाभाऊ पाटील, अशोक पाटील आदींच्या पथकाने केली.