भुसावळात गावठी कट्ट्यासह तिघे जाळ्यात
भुसावळ बाजारपेठ पोलिसांची गोपनीय माहितीवरून वांजोळा रोड भागात धडक कारवाई
भुसावळ : शहरातील वांजोळा रोड भागात संघटीत टोळीतील सदस्य गावठी कट्ट्याच्या धाकावर दहशत निर्माण करीत असल्याची माहिती बाजारपेठ पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी धाव घेत तिघांच्या मुसक्या आवळल्या. संशयीतांच्या ताब्यातून 15 हजार रुपये किंमतीचे गावठी कट्टा जप्त करण्यात आला. या प्रकरणी बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
गुन्हा करण्यापूर्वीच आवळल्या मुसक्या
शहरातील वांजोळा रोड भागात काही संशयीत गावठी पिस्टल बाळगून गुन्हा करण्याच्या उद्देशाने तसेच शस्त्र विक्रीच्या उद्देशाने आल्याची माहिती बाजारपेठ पोलिसांना मिळाल्यानंतर सोमवार, 31 रोजी रात्री नऊ वाजता पोलिस पथकाने धाव घेत तुषार किशोर खरारे व कमलेश किशोर खरारे (दोन्ही रा.विघ्नहर्ता नगर, जामनेर रोड, भुसावळ) व विजय संजय निकम (चोरवड, ता.भुसावळ) यांना अटक केली. संशयीतांच्या अंगझडतीतून 15 हजार रुपये किंमतीचा गावठी कट्टा व 30 हजार रुपये किंमतीची दुचाकी (एम.एच.19 डी.सी.8860) जप्त करण्यात आली. पोलिस नाईक निलेश बाबूराव चौधरी यांच्या फिर्यादीनुसार संशयीतांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सहाय्यक निरीक्षक मंगेश गोंटला करीत आहेत.
गोपनीय माहितीवरून कारवाई
ही कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे, अपर पोलिस अधीक्षक चंद्रकांत गवळी, पोलिस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे, बाजारपेठ पोलिस निरीक्षक राहुल गायकवाड, सहाय्यक निरीक्षक मंगेश गोंटला, सहाय्यक निरीक्षक गणेश धुमाळ, सहाय्यक निरीक्षक हरीष भोये, उपनिरीक्षक महेश घायतड, नाईक रमण सुरळकर, निलेश चौधरी, उमाकांत पाटील, प्रशांत परदेशी, योगेश माळी, प्रशांत सोनार आदींच्या पथकाने केली.