भुसावळात गुरांची निर्दयतेेने वाहतूक : आठ गुरांची सुटका : दोघांना अटक

भुसावळातील गो रक्षकांची सतर्कता : आठ गोवंशाची गो शाळेत रवानगी : 80 हजार रुपये किंमतीचे बोलेरो वाहन जप्त

भुसावळ : महेंद्रा बोलेरो वाहनातून गोवंशाची वाहतूक होत असल्याची माहिती गो प्रेमींना मिळाल्यानंतर त्यांनी शहर पोलिसांना माहिती कळवल्यानंतर शहरातील जळगाव रोडवरील भोईवाड्याजवळ संशयीत वाहन अडवल्यानंतर त्यात गोवंश (बैल) असल्याने वाहनासह दोघांना ताब्यात घेवून शहर पोलिस ठाण्यात आणण्यात आले. संबंधिताकडे गोवंश वाहतुकीचा परवाना नसल्याने व गुरांची अत्यंत निदर्यतेने वाहतूक होत असल्याने या प्रकरणी दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला व वाहनातील आठ गुरांची जळगावच्या गो शाळेत रवानगी करण्यात आली. शुक्रवार, 8 जुलै रात्री 11.30 वाजेच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली.

गो प्रेमींच्या सतर्कतेने गोवंशाची सुटका
शहरातील कृष्णा राजू साळी (गणेशपुरी, हनुमान नगर, भुसावळ) व भूषण रेवा महाजन (भिरूड कॉलनी, भुसावळ) यांनी शुक्रवारी रात्री संशयीत बोलेरो वाहनातून गुरांची वाहतूक होत असल्याची माहिती शहर पोलिसांना कळवली. पोलिस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे, शहर पोलिस निरीक्षक गजानन पडघाण यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक संदीप दुनगहू, हवालदार विजय चव्हाण, कॉन्स्टेबल योगेश घुगे,नाईक राजकिरण झाल्टे यांनी जळगाव रोडवरील भोई वाड्याजवळ बोलेरो (एम.एच.39 सी.9830) ही येताच तिची अडवून तपासणी केल्यानंतर त्यात आठ गोवंश आढळल्याने चालकाकडे गुरे वाहतुकीचा परवाना विचारला असता तो न दिल्याने 80 हजार रुपये किंमतीचे बोलेरो वाहन पंचांसमक्ष ताब्यात घेण्यात आले व नंतर वाहनातील 80 हजार रुपये किंमतीच्या आठ बैलांची सुटका करून त्यांची गो शाळेत रवानगी करण्यात आली.

दोघांविरोधात गुन्हा दाखल
पोलिस नाईक राजकिरण दिनकर झाल्टे यांच्या फिर्यादीनुसार बोलेरो चालक गणेश नंदकिशोर वैद्य (श्रीरामपेठ, फैजपूर) व मो.फैयाज मो.सागीर (ईस्लामपूर, सावदा) यांच्याविरोधात भुसावळ शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. दोघा आरोपींना पोलिसांनी अटक केली असून गुरांची वाहतूक करणारे वाहन जप्त केले आहे. तपास पोलिस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक संदीप दुनगहू करीत आहेत.