भुसावळात गोगानवमी आज विविध कार्यक्रमांचे आयोजन

0

छडी मिरवणुकीचे आकर्षण ; सकाळी निघणार दुचाकी रॅली

भुसावळ- वाल्मिक मेहतर समाजाचे आराध्य दैवत श्री वीर गोगादेव चौहाण यांच्या 111 व्या जयंती उत्सवानिमित्त भुसावळ शहरात मंगळवार, 4 रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शहरातील वाल्मिक नगरासह वर्दळीच्या भागात जयंतीनिमि शुभेच्छा फलक लावण्यात आले आहेत. सकाळी नऊ वाजता वाल्मिक नगरापासून दुचाकी रॅली काढण्यात येणार आहे. आठवडे बाजार, डेलि मार्केट, सराफ बाजार, मॉडर्न रोड, जुनी नगरपालिका, रेल्वे स्थानक, बसस्थानक, बाजारपेठ पोलिस ठाणेमार्गे ही रॅली पुन्हा मूळ जागी पोहोचणार आहे.

यंदा प्रथमच छड्यांची एकत्र मिरवणूक
युवा हृदय सम्राट व माजी नगरसेवक संतोष बारसे व उत्सव समितीचे अध्यक्ष अमित खरारे यांच्या मार्गदर्शनाखाली यंदा प्रथमच सर्व 12 छड्यांची सायंकाळी पाच वाजता वाल्मिक चौकापासून मिरवणूक काढण्यात येणार आहे. मिरवणुकीच्या अग्रभागी 50 लोकांचे ढोल व झांझ पथक राहणार असून मिरवणुकीत ते मोठे आकर्षण ठरणार आहे. उत्सवानिमित्त सायंकाळी आठ वाजेपासून महाप्रसादाचा कार्यक्रम होणार असून नागरीकांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन उत्सव समितीतर्फे करण्यात आले आहे.

भगत व टिकायतींचा होणार सन्मान
भव्य छडी मिरवणुकीच्या समारोपानंतर रात्री आठ वाजेच्या सुमारास वाल्मिक चौकातील जुन्या नेहरू मैदानावर मिरवणुकीत सहभागी झालेल्या भगतांसह उस्ताद खलिपा, मैल मुक्तीयार, टिकायती यांचे स्वागत व सत्कार करण्यात येणार आहे. या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून नगराध्यक्ष रमण भोळे यांच्यासह भाजपाचे नगरसेवक तसेच मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमास नागरीकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती द्यावी, असे आवाहन माजी नगरसेवक संतोष बारसे व उत्सव समितीचे अध्यक्ष अमित खरारे यांनी एका पत्रकान्वये केले आहे.