भुसावळ- शहरातील इंदिरा नगर भागातील एका टपरीत खाजगी वाहनात अवैधरीत्या घरगुती वापराचा गॅस भरला जात असल्याची गोपनीय माहिती बाजारपेठ पोलिस निरीक्षक देविदास पवार यांना मिळाल्यानंतर पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात चारचाकी वाहनासह गॅस भरण्याचे साहित्यासह 57 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला तर संशयीत आरोपी मात्र पोलिसांना पाहताच पसार झाला. बुधवारी दुपारी 12.15 वाजेच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली.
चारचाकी जप्त , आरोपी पसार
इंदिरा नगर भागातील एका टपरीत बेकायदा घरगुती वापराचा गॅस वाहनात टाकला जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर एएसआय अंबादास पाथरवट, दीपक जाधव, प्रशांत चव्हाण, निलेश बाविस्कर, वाहन चालक एएसआय तस्लीम पठाण आदींनी छापा टाकला मात्र संशयीत आरोपी शेख वसीम शेख सलीम हा पोलिसांना पाहताच पसार झाला. पोलिसांनी घटनास्थळावरून 50 हजार रुपये किंमतीची चारचाकी ओमनी (एम.एच.15 ए.एच.7382), पाच हजारांची इलेक्ट्रीक मोटार, दोन हजारांचे सिलिंडर आदी गॅस भरण्याचे साहित्य जप्त केले आहे. दरम्यान, मिलिंद चव्हाण यांच्या मालकिची ही ओमनी असून त्यांना समजपत्र देण्यात आल्याचे सूत्रांनी सागितले. पुरवठा अव्वल कारकुन महेंद्र दुसाने व पंच तथा साकेगाव कोतवाल जितेश चौधरी व भुसावळ कोतवाल रवींद्र धांडे यांची या कामी मदत घेण्यात आली. संशयीत आरोपी शेख वसीमविरुद्ध सायंकाळी एएसआय अंबादास पाथरवट यांच्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला.