महेश नगराच्या रस्त्यावर चारचाकी आडवी लावल्यावरून वाद विकोपाला ः जखमी चारचाकी चालकाची प्रकृती गंभीर
भुसावळ : महेश नगराकडे जाणार्या रस्त्यावरच चारचाकी उभी केल्याने झालेल्या वादातून चारचाकी चालकावर चाकूने हल्ला झाल्याची घटना मंगळवारी मध्यरात्री 12.30 वाजेच्या सुमारास नाहाटा महाविद्यालयाजवळील जलकुंभाजवळ घडली होती. या घटनेत सतीश यादव बाविस्कर (43, काशीनाथ नगर, भुसावळ) हा चालक गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर गोदावरी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी बाजारपेठ पोलिसांनी योगेश देविदास तायडे (महेश नगर) व तुषार शंकर जाधव व मंगेश अंबादास काळे (कृष्णनगर, भुसावळ) या आरोपींना अटक केली असून गुन्ह्यात वापरलेली चारचाकीदेखील जप्त केली आहे. शहरात दिवसागणिक गुन्हेगारी वाढत असून ती ठेचण्यासाठी आता ठोस पावले उचलण्याची गरज आहे.
रस्त्यावर गाडी लावल्याने पोटात मारला चाकू
सतीश बाविस्कर हे महामार्गाच्या कामासाठी लावण्यात आलेल्या चारचाकी वाहनावर चालक म्हणून कामास आहेत. मंगळवारी रात्री इंजि.मनोज जैस्वाल यांना त्यांनी नाहाटा महाविद्यालयाजवळ सोडल्यानंतर क्रुझर वाहन (एम.एच.28 व्ही.0739) त्यांनी महेश नगराकडे जाणार्या रस्त्यावर लावल्यानंतर काही वेळात फोर्ड कंपनीच्या चारचाकी (एम.एच.06 ए.एन.7844) मधून आलेल्या तिघा संशयीतांनी त्यांच्याशी वाद घालत त्यांच्या पोटात चाकू मारून पळ काढला. या घटनेनंतर या परीसरात प्रचंड खळबळ उडाली. पोलिसांनी जखमी बाविस्कर यांना गोदावरी रुग्णालयात दाखल केले असून त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात आले.
यांनी आवळल्या आरोपींच्या मुसक्या
पोलिस उपअधीक्षक गजानन राठोड, बाजारपेठ पोलिस निरीक्षक देविदास पवार यांनी आरोपींना अटक करण्याच्या सूचना केल्यानंतर बाजारपेठ पोलिस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक रावसाहेब किर्तीकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुनील जोशी, उमाकांत पाटील, शंकर पाटील, दीपक जाधव, ईश्वर भालेराव, रमण सुरळकर आदींनी आरोपींच्या मुसक्या आवळल्या. आरोपींनी गुन्ह्यात वापरलेले वाहनही पोलिसांनी जप्त केले असून सायंकाळपर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.