भुसावळात चोरट्यांची सुसाट एक्स्प्रेस

0

चोर्‍या वाढल्या ; जंक्शन आले, बॅगा, पर्स सांभाळा म्हणण्याची प्रवाशांवर वेळ

भुसावळ- रेल्वे गाड्यांना वाढलेली गर्दी चोरट्यांच्या पथ्थ्यावर पडली आहे तर भुसावळातील जंक्शन स्थानकांवर दररोज होणार्‍या चोर्‍यांमुळे प्रवाशांमध्ये भीती पसरली असून लोहमार्ग पोलिसांच्या कार्यक्षमतेवरही प्रश्‍नचिन्ह उपस्थित होत आहे.

24 तासात तीन चोर्‍या ; लाखोंचा ऐवज लंपास
रविवारी सेवाग्राम एकस्प्रेसच्या एस 9 या डब्यातून प्रवास करणार्‍या कृष्णा भागवतराव वानखेडे (रा. उल्हासनगर) यांच्या पत्नीची चोरट्यांनी पर्स लांबवली. नागपूर-कल्याण प्रवास करीत असतना रात्री 10 ते 12.40 यावेळात ही घटना घडली. बडनेरा येथे जाग आल्यावर चोरीचा प्रकार लक्षात आला. पर्स मध्ये दोन मोबाईल, 600 रूपये रोख, आधारकार्ड, एटीएम कार्ड असा ऐवज चोरीला गेला. याप्रकरणी भुसावळ लोहमार्ग पोलिस ठाण्यात अनोळखी चोरट्याविरूध्द कृष्णा वानखेडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भुसावळ लोहमार्ग पोलिसांनी दाखल केलेला गुन्हा बडनेरा लोहमार्ग पोलिसांकडे वर्ग केला.

खिडकीतून हात टाकून ओढले महिलेचे मंगळसूत्र
राजेंद्र माधवजी घोडकी (रा. बागुल गलिया, देवास, मध्यप्रदेश) हे डाऊन झेलम एक्स्प्रेसने कोपरगाव ते भुसावळ प्रवास करीत असताना 19 मे रोजी रात्री 2.45 वाजेच्या सुमारास गाडी भुसावळ आऊटरवर आली असतांना त्यांच्या पत्नीचे मंगळसूत्र चोरट्यांनी लांबवले. सुमारे 40 हजार रूपये किंमतीचे मंगळसूत्र होते. लोहमार्ग पोलिस ठाण्यात राजेद्र घोडकी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चोरट्या विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक फौजदार कीशोर वाघ पुढील तपास करीत आहे.

जनता एक्स्प्रेसमधून झोपेचा फायदा घेत पर्स लंपास
मुगलसराय ते कल्याण असा जनता एक्स्प्रेसच्या एस-तीन व 68 क्रमांकाच्या सीटवर बसून प्रवास करीत असलेले राम आसरे रामबली यादव (रा. चिंचपाडा, कल्याण) हे त्याच्या पत्नीसमवेत मंगळवारी प्रवास करीत असतांना झोपेचा फायदा घेत त्यांची पर्स चोरट्यांनी लांबवली. पर्समध्ये 45 हजार रूपये किंंमतीची सोन्याची साखळी तसेच 1200 रूपये रोख, मोबाईल असा एकुण 48 हजार 200 रूपयांचा ऐवज लांबवला. ही घटना बर्‍हाणपूर ते भुसावळ या दरम्यान घडली. याप्रकरणी भुसावळ लोहमार्ग पोलिस ठाण्यात यादव यांच्या फिर्यादीवरून चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. सहायक फौजदार बाबुलाल खरात हे तपास करीत आहे.