भुसावळात जय गणेश फाउंडेशनतर्फे तीन दिवसीय ‘फिरती व्याख्यानमाला’

0

तीन शाळांमध्ये राबवणार उपक्रम;  आयोजन समितीच्या बैठकीत माहिती

भुसावळ- शहरातील जय गणेश फाउंडेशनतर्फे तीन दिवसीय फिरती व्याख्यानमाला आयोजित करण्यात येत आहे. रुपरेषा ठरवण्यासाठी सोमवारी आयोजन समितीची बैठक घेण्यात आली. त्यात यंदा 26 ते 28 जुलै असे तीन दिवस तीन शाळांमध्ये हा उपक्रम राबवण्याचे निश्चित करण्यात आले. दोन पुरुष आणि एका महिला वक्त्याला निमंत्रित करण्यात येणार आहे. मनोरंजन वाहिनीच्या मायााजालात नवी पीढी गुरफटली आहे. तिला त्यातून बाहेर करून वाचन, चिंतन, मननाची गोडी लागावी या उद्देशाने ही व्याख्यानमाला सुरू करण्यात आली. यंदा तिचे चौथे वर्ष आहे. वक्त्याला विद्यार्थीदशेतील रसिकांपर्यंत नेऊन विचारपुष्प गुंफणे असे या उपक्रमाचे स्वरुप आहे. एक महाविद्यालय आणि दोन माध्यमिक शाळा अशा तीन ठिकाणी या उपक्रमांतर्गत तीन व्याख्याने होतील, अशी माहिती फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष उमेश नेमाडे यांनी दिली.
26 ते 28 जुलैदरम्यान व्याख्यानमाला
रोटरी क्लब ऑफ भुसावळचे माजी अध्यक्ष तथा जय गणेश फाउंडेशनचे समन्वयक अरुण मांडळकर, माजी नगरसेविका सुषमा नेमाडे, जिल्हा साक्षरता समितीचे सदस्य गणेश फेगडे यांच्यासह पदाधिकारी व आयोजन समितीचे सदस्य उपस्थित होते. वर्तमानाचा वेध घेऊन कला, साहित्य, संस्कृती, संस्कार हा चतुष्कोन डोळ्यासमोर ठेऊन यंदा विचारपुष्प गुंफले जातील. 26 ते 28 जुलै असे तीन दिवस होणार्‍या या फिरत्या व्याख्यानमालेत दोन पुरुष आणि एका महिला वक्त्याला निमंत्रित करण्यात येणार आहे. तीन वर्षांपासून सुरू असलेल्या या उपक्रमाचा सुमारे साडेचार हजार विद्यार्थ्यांनी लाभ घेतला आहे. या अनुषंगाने व्यापक स्वरुप देण्याचा प्रयत्न असल्याची माहिती या बैठकीत देण्यात आली.
चिंतन, मननाची लागणार गोडी -अरुण मांडळकर
शालेय जीवनात काय वाचावे आणि काय वाचू नये? या प्रश्नाचे उत्तर विद्यार्थ्यांना या उपक्रमातून आपसूक मिळते. वक्तृत्वशैली विकसित करण्याच्या टिप्स वक्त्यांच्या व्याख्यानाच्या शैलीतून कळत-नकळत मिळतात. सद्विचारांची मांडणी करणार्‍या प्रतिभावंतांची ओळख विद्यार्थीदशेपासून करून देण्याचा प्रयत्न या उपक्रमाच्या माध्यमातून होतो. ज्येष्ठ नागरिकांची स्वयंप्रेरणेने लाभणारी उपस्थिती ही उपक्रमाची खरी फलश्रृती आहे. त्यांच्यासाठी खास बैठक व्यवस्था राहणार आहे, असे समन्वयक अरुण मांडळकर यांनी सांगितले.
वक्त्यांना काव्यप्रतिमा भेट देणार 
जय गणेश फाउंडेशनने अक्षरसेवेची पालखी खांद्यावर घेतली आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, तिची अभिरूची वाढावी म्हणूून निरंतर लेखन करणार्‍या नामवंत कवींचे काव्यसंग्रह आणि अक्षरचित्राचं कोंदण लाभलेल्या काव्यप्रतिमा भेट देण्यात येणार आहेत. समृद्ध जीवन जगण्याची प्रेरणा देणार्‍या अक्षरांनाच आपले आयडॉल समजू या, असा संदेश देण्यासाठी ही संंकल्पना आकारास येत आहे, असे फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष नेमाडे यांनी या बैठकीत आवर्जून नमूद केले.