भुसावळ- विघ्नहर्ता गणेशाचे गुरूवारी ढोल-ताश्यांच्या गजरात शहरातील विविध सार्वजनिक मंडळांसह घरा घरात आगमन झाले. सकाळपासून रात्री उशिरापर्यंत गणरायाची मुर्तीचे मंडळांमध्ये आगमन झाले. भाविकांनी मूर्ती घेण्यासाठी सकाळपासून गर्दी केली होती तर गणरायासाठी आरास आणि पुजा खरेदीसाठीही बाजारपेठ गजबजली होती. गणेशोत्सवाच्या पार्श्वभुमीवर शहरातील विविध भागात पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. शहरात 196 सार्वजनिक मंडळातर्फे श्रीची उशीरापर्यत स्थापना करण्यात आली.
मुहूर्तावर गणरायांची स्थापना
गणपतीच्या आगमनानिमीत्त घराघरांमध्ये उत्साह जाणवत होता, सकाळपासूनच मुहूर्त शोधून भाविकांनी गणरायाची विधीवत स्थापना केली. शहरातील बाजारपेठेत भाविकांनी गर्दी केली होती, गणरायाची मुती खरेदीपासून मोदक, दुर्वा, पूजा, केळीचे खांब, फळे घेण्यासाठी भाविकांची लगबग होती. शहरातील गर्दी लक्षात घेता पोलिस प्रशासनाकडून सुध्दा याची दखल घेण्यात आली, शहरात सकाळी आठवाजेपासूनच पोलिसांची गस्त सुरू करण्यात आली होती. तसेच शहरातील महत्वाच्या ठीकाणी पोलिसांचे फिक्स पॉइंट लावण्यात आले होते. पोलिस निरीक्षक देवीदास पवार यांनी शहरातील बाजारपेठेसह विविध गणेश मंडळांना भेटी देऊन सुरक्षेच्या दृष्टीने मंडळाच्या पदाधिकार्यांना सूचना केल्यात. तसेच शहर पोलिस ठाण्याच्या हद्दितही निरीक्षक बाबासाहेब ठोंबे यांनीही गणेश मंडळांना भेटी दिल्यात. बंदोबस्ताची पाहणी केली.