भुसावळात जीपीआरएस प्रणालीला ‘खो’

0

भुसावळ : भुसावळातील शासकीय धान्य गोदामातून प्रति क्विंटल तीन ते चार किलो धान्य कमी मिळत असल्याची तक्रार जि.प.सदस्य पल्लवी प्रमोद सावकारे यांनी दोन दिवसांपूर्वीच जिल्हाधिकार्‍यांकडे केली होती तर या संदर्भात तालुक्यातील वांजोळा येथील स्वस्त धान्य दुकानात कमी आलेल्या धान्याचा पुरावाही दिला होता. या पार्श्‍वभूमीवर भुसावळातील दिनेश उपाध्याय यांनीदेखील स्थानिक तहसील प्रशासन व शासकीय गोदामातील अनागोंदीवर बोट ठेवत पंतप्रधान, मुख्यमंत्री, अन्न व पुरवठा मंत्री तसेच जिल्हाधिकार्‍यांकडे तक्रार केली आहे. भुसावळातील शासकीय गोदामात धान्याच्या मोजणीसाठी डिजिटल काटा अनिवार्य असताना गेल्या अनेक वर्षांपासून साध्या वजनकाट्यावर धान्य मोजले जात असल्याची तक्रार करण्यात आली आहे तर वाहतूक निविदा कराराप्रमाणे मंजूर यादीतील वाहनांवर (धान्य वाहतूक करणार्‍या) जीपीएस प्रणाली आवश्यक असतानाही ट्रक वा अन्य वाहनांवर तिचा वापर होत नसल्याचा आरोप करण्यात आला आहे.

तक्रारीतून प्रशासनाच्या कारभारावर ठेवले बोट
दिनेश उपाध्याय यांच्या तक्रारीचा आशय असा की, धान्य गोदामातील गैरव्यवहारांबाबत अनेकदा तक्रार करूनही दखल घेण्यात आलेली नाही शिवाय दक्षता समितीची नियमित बैठक होत नाही, शासकीय गोदामांची अधिकारी नियमीतरीत्या तपासणी करीत नाहीत, क्रॉस तपासणी रेस्ट हाऊस वा कार्यालयात बसून होते तसेच तपासणी बाहेरील अधिकारी करीत जरी असलेतरी धान्य नेमके कमी का येते? असा प्रश्‍नही त्यांनी उपस्थित केला आहे. धान्य दुकानदारांना तात्पुरती दुकाने जोडली जाताना शासन निर्णयानुसार कारवाई होत नाही शिवाय द्वारपोच योजनेत धान्य देण्याबाबत शासन निर्णय असताना वाहतूक व हमाल निविदा धारक हे धान्य दुकानदारांकडून वाहतूक भाडे व हमाली बेकायदेशीररीत्या वसुल करतात व याबाबत महिला बचत गट दुकानदार व दुकानदार संघटनेने तक्रार केली आहे. वाहतूक निविदा कराराप्रमाणे मंजूर यादीतील वाहनांवर जीपीआरएस प्रणाली लावणे गरजेचे असताना एकाही ट्रक वा वाहनांवर ही प्रणाली नसल्याचा आरोपही उपाध्याय यांनी केला आहे. दरम्यान, तहसीलदार दीपक धीवरे यांची या संदर्भात भूमिका जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याशी संपर्क होवू शकला नाही.