भुसावळ : रंगात आलेला जुगाराचा डाव बाजारपेठ पोलिसांच्या डीबी पोलिसांनी उधळत आठ जुगारींच्या मुसक्या आवळत सव्वा लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. जाम मोहल्ला भागातील अमरदीप लॉजमध्ये मंगळवारी रात्री सव्वा नऊ वाजता ही कारवाई करण्यात आली. अटकेतील संशयीतांची नंतर जामिनावर सुटका करण्यात आली.
गोपनीय माहितीवरून पोलिसांची कारवाई
शहरातील जाम मोहल्ला भागातील अमरदीप लॉजमध्ये जुगाराचा डाव सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर बाजारपेठ डीबी शाखेने कारवाई करीत आठ संशयीतांना ताब्यात घेतले. अटकेतील संशयीतांमध्ये जावेद खान आकिब खान (37, खडका रोड, उस्मानिया कॉलनी), विनोद प्रभाकर चौधरी (45, शनी मंदिर, शेख तासलीम शेख मनवर (42, खडका रोड, रामदेव बाबा मंदिराजवळ), अब्दुल नदीम अब्दुल रौफ (40, जाम मोहल्ला, नईम पहेलवान यांच्या घराजवळ), चिरोगोद्दीन शेख अहमद (40, खडका चौफुली, मन्नत अपार्टमेंट), रहिम शेख गनी (44, फकीर वाडा), सिराज मोहम्मद शेख (36, फकीर वाडा, जाम मोहल्ला) फिरोजशहा बशीर शहा (29, मुस्लिम कॉलनी) यांचा समावेश असून सर्व आरोपी भुसावळातील रहिवासी आहेत. कॉन्स्टेबल प्रशांत रमेश परदेशी यांच्या फिर्यादीवरून आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपींच्या ताब्यातून 45 हजार 270 रुपये जुगाराचे साहित्य व मोबाईल फोन मिळून एक लाख 25 हजार 270 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
यांनी आवळल्या आरोपींच्या मुसक्या
ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे, बाजारपेठ पोलीस ठाण्याचे निरीक्षक दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली सहा.निरीक्षक अनिल मोरे, पोलीस नाईक रवींद्र बिर्हाडे, कॉन्स्टेबलदिनेश कापडणे, परेश बिर्हाडे, सुभाष साबळे आदींच्या पथकाने केली. अधिक तपास सहा.निरीक्षक गणेश धुमाळ करीत आहेत.