भुसावळात जुन्या वादातून तरुणावर चाकूहल्ला

भुसावळ : तीन वर्षांपूर्वी झालेल्या वादाच्या रागातून 22 वर्षीय तरुणावर चाकू हल्ला करण्यात आल्याची घटना जामनेर रोडवरील दीनदयाल नगरात सोमवार, 31 रोजी सायंकाळी साडेसात वाजता घडली. या घटनेने शहरात मोठी खळबळ उडाली. चाकूहल्ल्यात गुलाम गौस कालू शहा (22, मुस्लीम कॉलनी, बोहरे मशीदजवळ, भुसावळ) हे जखमी झाले असून त्यांच्यावर गोदावरी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

जुन्या भांडणाचा वचपा काढण्यासाठी चाकूहल्ला
पोलिस सूत्रांच्या माहितीनुसार, सुमारे तीन वर्षांपूर्वी गुलाम शहा यांचे दारू पिण्याच्या कारणावरून संशयीत आरोपी शेख अरबाज शेख (भुसावळ) याच्यासोबत भांडण झाले होते मात्र नंतर हे भांडण मिटले होते मात्र सोमवार, 31 रोजी सायंकाळी साडेसात वाजता जुन्या भांडणाचा राग मनात ठेवून संशयीत आरोपी शेख अरबाज शेख याने गुलाम गौस हे जामनेर रोडवरील दीनदयाल नगराजवळ उभे असताना अचानक पाठीमागून येवून पाठीवर चाकू मारला. अचानक झालेल्या हल्ल्याने ते जमिनीवर कोसळले. यावेळी सहकार्‍यांनी त्यांना गोदावरी रुग्णालयात दाखल केले. दरम्यान, चाकू हल्ल्याची माहिती कळताच पोलिस यंत्रणेने घटनास्थळी धाव घेतली. संशयीत पसार झाला असून त्याचा कसून शोध सुरू करण्यात आला आहे.