भुसावळात झोपडपट्टी अतिक्रमण धारकाची आत्महत्या

0

भुसावळ- शहरातील आगवाली चाळ भागातील अतिक्रमणधारकाने रूमालाने छताच्या अँगलला गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना सोमवारी दुपारी पाच वाजेच्या सुमारास उघडकीस आली. रेल्वे प्रशासनातर्फे या जागेवरील अतिक्रमण लवकरच काढण्यात येणार असून त्या विवंचनेत संबंधिताने आत्महत्या केल्याची चर्चा घटनास्थळी होती. प्रकाश भिवाजी बनसोडे (42, आगवाली चाळ, भुसावळ) असे आत्महत्या करणार्‍या व्यक्तीचे नाव आहे. याबाबत शहर पोलिसात संतोष सुरेश बनसोडे (नॉर्थ कॉलनी) यांनी खबर दिल्यावरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. मयत बनसोडे यांच्या पश्‍चात पत्नी, मुलगा, मुलगी असा परीवार असून सहा महिन्यांपूर्वीच त्यांच्या पत्नी मुलांसह माहेरी गेल्याचे सांगण्यात आले. हातमजुरी करून कुटुंबाचा रहाटगाडा ओढणार्‍या बनसोडे यांनी नेमकी आत्महत्या का केली? याचे कारण कळू शकलेले नाही तर पोलिसात दाखल खबरीनुसार त्यांनी कौटुंबिक कारणातून आत्महत्या केल्याचे म्हटले आहे. तपास सहाय्यक फौजदार संजय कंखरे करीत आहेत.

रेल्वे प्रशासनावर गुन्हा दाखल करा ; 21 रोजी जेलभरो
अतिक्रमण काढण्याच्या धास्तीने प्रकाश बनसोडे यांनी आत्महत्या केली असून त्यांच्या आत्महत्येला जवाबदारी असलेल्या डीआरएम यांच्याविरुद्ध भादंवि 304 नुसार गुन्हा दाखल करावा, अशी मागणी माजी नगरसेवक तथा पीआरपीचे जिल्हाध्यक्ष जगन सोनवणे यांनी केली आहे. बनसोडे यांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही, 21 नोव्हेंबर रोजी दुपारी काशी एक्स्प्रेस रोखण्यात येणार असून त्यानंतर महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून शहीद मोर्चा प्रांताधिकारी कार्यालयावर काढण्यात येईल व नंतर जेलभरो आंदोलन करू, असा इशाराही सोनवणे यांनी दिला आहे.