भुसावळात डीजे चालकानेच लांबवले साहित्य ; दोघे संशयीत ताब्यात

0

चार महिन्यांपूर्वी झालेल्या चोरीचा उलगडा ; मुख्य संशयीतांचा शोध डीबी शाखेकडून कसून शोध सुरू

भुसावळ- डीजे चालकानेच दुसर्‍या डीजे चालकाच्या वाहनातील महागडे साहित्य लांबवल्याप्रकरणी दोघांना ताब्यात घेण्यात आले. आरोपींनी चौकशीत साहित्य लांबवल्याची कबुली देत महागडे तीन लाखांचे साहित्य काढून दिले आहे. चार महिन्यांपूर्वी झालेल्या चोरीचा उलगडा करण्यात बाजारपेठ पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात येणार असल्याची माहिती सहाय्यक पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी दिली.

चोरीचा उलगडा, आरोपी जाळ्यात
सुमारे चार महिन्यांपूर्वी मौर्या डीजेचे संचालक रूपेश देशमुख यांच्या डीजेच्या वाहनातून तीन लाख रुपये किंमतीचे महागडे साहित्य नाहाटा महाविद्यालयामागील बाजूने चोरीस गेले होते. या गुन्ह्याचा तपास सुरू असताना डीजे ऑपरेटर शेखर अशोक अग्रवाल (32, गुंजाळ कॉलनी) व अभिषेक शर्मा (19, चमेली नगर, भुसावळ) यांना ताब्यात घेण्यात आल्यानंतर शर्मा याने साहित्य चोरल्याची कबुली देत महागडे साहित्य काढून दिले. विशेष म्हटले ताब्यात घेतलेला शर्मा हा स्वतः डीजे चालक असून त्याच्या जय महाकाल या डीजेच्या वाहनातून लांबवलेल्या साहित्य पोलिसांनी जप्त केले. रात्री उशिरा संशयीतांची पोलिसांकडून चौकशी सुरू होती. या गुन्ह्यात शर्मा यास आरोपी दाखवण्यात आले असून अग्रवाल यास केवळ चौकशीकामी ताब्यात घेण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. या गुन्ह्यात शर्मा सोबत अन्य काही मुख्य आरोपी असल्याचा पोलिसांना संशय आहे. त्या दृष्टीने तपास सुरू असल्याचे सांगण्यात आले.

यांनी केली कारवाई
सहाय्यक पोलीस अधीक्षक नीलोत्पल व बाजारपेठ निरीक्षक चंद्रकांत सरोदे यांच्या मार्गदर्शनाखाली डीबीचे एएसआय आनंदसिंग पाटील, विकास सातदिवे, प्रशांत चव्हाण, बंटी कापडणे, माणिक सपकाळे, एजाज पठाण आदींनी ही कारवाई केली. तपास एएसआय अंबादास पाथरवट करीत आहेत.