ऋषितुल्य वैद्य श्रीकरतात्या जळूकरांचा वारसा सातत्याने सुरू रहावा -आमदार हरीभाऊ जावळे
भुसावळ – भारतातील दुसरे आणि महाराष्ट्रातील पहिले आरोग्य देवतेचे धन्वंतरी मंदिर भुसावळमध्ये ज्यांनी स्थापन केले असे आयुर्वेदाचार्य व ऋषितुल्य वैद्य श्रीकरतात्या जळूकर यांनी आयुष्यभर रुग्णांची सेवा केली. ही सेवा सातत्याने सुरू राहावी यासाठी त्यांनी आयुर्वेद संशोधन सेवा मंडळाची स्थापना केली. त्यामुळे तात्यांचा कार्याचा वारसा अखंडितपणे सुरू रहावा, असे प्रतिपादन आमदार हरिभाऊ जावळे यांनी येथे केले. भुसावळ येथील नाहाटा महाविद्यालयामागील धन्वंतरी नगरातील धन्वंतरी भवन मंदिर येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही आयोजित धन्वंतरी पुरस्कार प्रदान समारंभ पार पडला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.
यांची व्यासपीठावर उपस्थिती
व्यासपीठावर अध्यक्षस्थानी जळगाव येथील डॉ. सुदर्शन नवाल, आयुर्वेद संशोधन सेवा मंडळाच्या अध्यक्षा वैद्य उषाताई जळूकर, आशुतोष केळकर उपस्थित होते. प्रारंभी विनायकशास्त्री जोशी यांच्या मंत्रोपचारात धन्वंतरी देवतेची पूजा करून आरती करण्यात आली. त्यानंतर तात्या जळूकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. प्रास्ताविकात सुश्रुत जळूकर यांनी मंडळाच्या स्थापनेपासून तर आजतागायत केलेल्या विविध उपक्रमांची माहिती देऊन आरोग्यक्षेत्रात करत असलेल्या मंडळाच्या सेवाभावी कार्याचा परीचय दिला. त्यानंतर आमदार हरीभाऊ जावळे यांच्या हस्ते डॉ.सुजाता केळकर यांना सन्मानपत्र, शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन धन्वंतरी पुरस्कार 2018 प्रदान करण्यात आला. डॉ. नवाल यांचा परीचय स्वरदा जळूकर हिने तर डॉ. केळकर यांचा परीचय सुश्रृत जळूकर यांनी करून दिला. आ.हरीभाऊ जावळे यांनी आपल्या मनोगतात तात्यांच्या कार्याचा आढावा घेऊन आरोग्य क्षेत्रातील मंडळाच्या कार्याचे कौतुक केले. सत्कारार्थी मनोगतात डॉ.सुजाता सुजाता केळकर यांनी कुटुंबियांचे व मंडळाचे आभार मानून आरोग्यक्षेत्रातील केलेल्या उल्लेखनीय कामाची ही पावती असून कामाची जबाबदारी अजून वाढणार असल्याचे त्यांनी सांगितले. अध्यक्षीय मनोगतात डॉ. सुदर्शन नवाल यांनी डॉ. केळकर यांचे कौतुक करून आरोग्यक्षेत्रातील हा मानाचा पुरस्कार आधी डॉ.आशुतोष केळकर व नंतर त्यांच्या पत्नी डॉ. सुजाता केळकर यांना मिळाला आहे तसेच या पुरस्काराने त्यांच्या कामाचा गौरव झाला असून त्यांच्या कामाची ऊर्जा देखील वाढणार असल्याचे त्यांनी सांगितले. वैद्य उषाताई जळूकर यांनी डॉ. केळकर यांना शुभेच्छा देऊन आयुर्वेद संशोधन सेवा मंडळाला वेळोवेळी सहकार्य करण्याचे आवाहन केले.
यांनी घेतले परीश्रम
कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या विविध मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. तसेच अनेकांनी डॉ. सुजाता केळकर यांचा सत्कार केला. जान्हवी चौधरी हिने पसायदान म्हटले. सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन महेश चौधरी यांनी केले. धन्वंतरी मंदिराच्या गच्चीवर डॉ. संजीवनी राजवाडे यांनी त्यांचे वडील डॉ. द. मो. तंत यांच्या स्मरणार्थ आर्थिक सहकार्याने बांधण्यात आलेल्या दोन खोल्यांचे उद्घाटन डॉ.सुजाता केळकर व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यशस्वीतेसाठी आर. के. पाटील, शंभू गोडबोले, भूषण पारधे, हेमंत सावकारे, निखील गणानी, रोहित बोदडे, विशाल धुंदे, भागवत रामदास पाचपांडे गुरूजी, रघुनाथ अप्पा सोनवणे, अपर्णा जळूकर, स्वरदा जळूकर, समृद्धी जळूकर आदींनी परीश्रम घेतले.