भुसावळात तक्रार निवारण दिनात 12 तक्रारदारांमध्ये समजोता

दोन तक्रारींबाबत गुन्हे होणार दाखल : अवैध सावकारीबाबत तक्रारदारांची चुप्पी

भुसावळ : तक्रार निवारण दिनात शनिवारी तब्बल 19 तक्रारी प्राप्त झाल्या. त्यातील 12 तक्रारींमध्ये समझोता झाल्यानंतर दोन तक्रारींबाबत गुन्हा दाखल होणार असल्याची माहिती पोलिस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी दिली. दर महिन्याच्या पहिल्या शनिवारी पोलिस ठाण्यात आयोजीत करण्यात येत असलेल्या तक्रार निवारण दिनात अवैध सावकारी फोकस करण्यात आला असलातरी तक्रारदारांनी मात्र या प्रश्नी चुप्पी साधली. तक्रारदारांना आता पोलिसांना अधिक बळ देवून तक्रारी देण्यासाठी प्रवृत्त करावे लागणार आहे

12 तक्रारींमध्ये समझोता
भुसावळ शहर पोलिस ठाण्यात शनिवारी तक्रार निवारण दिन झाला. शहर पोलिस ठाणे, बाजारपेठ व तालुका पोलिस ठाण्यातील तक्रारी अर्ज केलेल्या सर्वच अर्जदारांना पोलिसांनी बोलाविले होते. प्रसंगी डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे, पोलिस निरीक्षक गजानन पडघण उपस्थित होते. यावेळी तक्रार दिनासाठी आलेल्यांमध्ये कौटुंबिक समस्या, फसवणूक, किरकोळ गोष्टीवरून वाद करणे, ठेवीदार, शाळेतून पगार मिळत नसल्याने शाळेबद्दल करण्यात आलेली तक्रार, प्लॉट खरेदी-विक्रीत झालेली फसवणूक आदी तक्रारी होत्या. दरम्यान, अवैध सावकारांविरूध्द एकही तक्रार न आल्याने पोलिसांना आता तक्रारदारांना अधिक बळ द्यावे लागणार असून त्यानंतर याबाबत तक्रारदार पुढे येण्याची आशा आहे.

तर अतिक्रमणाबाबत पोलिस प्रशासन गंभीर
जुना सातारा भागात दोन गटात युवक एकमेकांकडे खुन्नसने पाहतात व सीसीटीव्ही काढून टाकतात त्यामुळे दखल घेण्याची मागणी लोकप्रतिनिधींनी केली होती. या भागातील अतिक्रमणातील दुकाने, टपर्‍या या पालिकेला पत्र देऊन काढून टाकण्यात येतील, जर कोणी मुद्दा प्रतिष्ठेचा करीत कायदा हातात घेतला तर त्यांना कायद्याचा हिसका दाखवा, असा इशारा डीवायएसपी वाघचौरेंनी दिला.