भुसावळात तरुणाच्या डोक्यात बिअरची बाटली फोडली : दोघांविरोधात गुन्हा

भुसावळ : दारूच्या पैशांच्या कारणावरून तिघांमध्ये भांडण झाल्यानंतर तरुणाच्या डोक्यात बिअरची बाटली फोडून त्यास जखमी करण्यात आले. ही घटना शहरातील स्टेट बँकेजवळील हॉटेल गोकुळबाहेर शुक्रवार, 10 रोजी दुपारी चार वाजेच्या सुमारास घडली. या प्रकरणी चार दिवसानंतर अर्थात सोमवारी बाजारपेठ पोलिस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

दोघांविरोधात गुन्हा दाखल
उमेश सुर्यकांत खुपसे (35, रा.शिवपूर कन्हाळा रोड, गोविंद कॉलनी, भुसावळ) हा तरुण आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. शुक्रवार, 10 जून रोजी दुपारी चार वाजेच्या सुमारास उमेश खूपसे हा सुरज कोळी (रा.खडका, ता.भुसावळ) आणि मयूर अरुण कोलते (रा.मातृभूमी चौक, भुसावळ) यांच्यासोबत दारू पिण्यासाठी बसल्यानंतर उभयंतांचे दारूच्या पैशांवरून शाब्दीक भांडण झाले व मयूर कोलते यांनी तक्रारदार उमेशच्या तोंडावर, गळ्यावर, हनुवटीवर व डोक्यावर बिअरची बाटली मारून दुखापत केली. ट्रामा केअर सेंटरमध्ये उपचार घेतल्यानंतर खुपसे याने भुसावळ बाजारपेठ पोलिस ठाण्यात सोमवारी तक्रार दिल्यानंतर दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलिस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक उमाकांत पाटील करीत आहेत.