भुसावळ- पंचायत समिती सदस्यांना पूर्वीप्रमाणेच 14 व्या वित्त आयोगाच्या शिफारशी लागू करण्यात याव्यात, ज्ल्हिा नियोजन समितीवर सभापतींना सदस्य म्हणून घेण्यात यावे, सदस्यांना 50 लाखांपर्यंत निधी उपलब्ध करून देण्यात यावा, मनरेगाच्या कामांची मंजूरी देण्याचा अधिकार सभागृहाला देण्यात यावा आदी मागण्यांसाठी राज्यभरातील पंचायत समितीचे सदस्य, सभापती व उपसभातींनी 7 मार्च 2018 रोजी विविध मागण्यांसाठी मुंबईच्या आझार मैदानावर उपोषण केले होते. 23 ते 25 जानेवारी 2019 रोजी पंचायतराजचे निर्मिते स्व.यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी कराड येथे नुकतेच तीन दिवशीय लाक्षणीक उपोषण करण्यात आले होते. परंतु शासनाकडून यासंदर्भात अद्यापर्यंत कोणताही ठोस निर्णय न झाल्यामुळे राज्यातील बहुतांश सभापती, उपसभापती व सदस्यांनी सामुहिक राजीनामे देण्यास सुरूवात केली आहे. यानुसार सोमवारी कुर्हा गणाचे सदस्य सुनील महाजन, हतनूर गणातील वंदना उन्हाळे, वराडसीम गणाच्या मनिषा पाटील यांनी आपल्या पदाचा राजीनामा सभापती प्रीती पाटील यांच्याकडे सादर केला. मंगळवारी या राजीनाम्यासह प्रीती पाटील या जिल्हा परीषद अध्यक्षांकडे सादर करणार आहेत. तळवेल गणातील सदस्य विजय सुरवाडे हे नागपूर येथे गेल्याने ते आपल्या पदाचा राजीनामा मंगळवारी सादर करणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.