गॅस एजन्सी मालकासह कर्मचार्यात वाद विकोपाला
भुसावळ- गॅस एजन्सी मालकासह कर्मचार्यातील वाद विकोपाला गेल्यानंतर टोळक्याने तीन रीक्षांच्या काचा फोडत दहशत निर्माण केल्याची घटना शनिवारी सकाळी 10 वाजेच्या सुमारास जळगाव रस्त्यावरील तहसील कार्यालयासमोर घडली. भुसावळ गॅस एजन्सीतील सिलिंडर वाटप करणारे कर्मचारी अजगर खान व कमलाकर कोळी, शुभम कोळी यांच्यातील वाद मालकापर्यंत गेल्यानंतर उभयतांमध्ये वाद वाढला. यावेळी अजगर खान यांनी आपल्या मुलाला मोबाईलद्वारे माहिती दिल्यानंतर त्याने आपल्या चार मित्रांना सोबत घेत गॅस एजन्सीच्या तीन रीक्षांचे काच मोठा दगड मारून फोडले व हल्लेखोरांनी पेट्रोल पंपाकडेही धाव घेतल्याने दहा मिनीटासाठी पेट्रोल पंप बंद करण्यात आला. तिन्ही रीक्षांचे काच फोडल्याने सर्वत्र काचांचा खच्च पडला होता. हल्लेखोरांनी एम.एच. 19 बीएम 0971, एम.एच. 19 जी.4435 व एम.एच.19 बी.एम.0085 या गाड्यांच्या काचा फोडल्यात.
पोलिसांकडून हल्लेखोरांची धुलाई
पोलिस निरीक्षक बाबासाहेब ठोंबे यांना घटना कळताच त्यांच्यासह कर्मचार्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी गॅस एजन्सीच्या कर्मचार्यांकडून माहिती घेत अवघ्या तासभराच्या आत गाडीच्या काचा फोडणार्यांच्या मुसक्या आवळल्यात. पेट्रोल पंप बंद करण्याची भाषा करणार्यांना पोलिसांनी चांगलाच पोलिसी खाक्या दाखवण्यात आला. यावेळी गॅस एजन्सीचे शुभम चौबे यांनी डीवायएसपी गजानन राठोड, पोलिस निरीक्षक बाबासाहेब ठोंबे यांची भेट घेऊन कर्मचार्यांचे आपसात समझोता झाला असून मलाही तक्रार द्यायची नाही असे सांगितल्याने गुन्हा दाखल झाला नाही.