भुसावळात थर्टी फस्टला उतरली मद्यपींची झिंग : 11 जणांवर कारवाई

शहरात वेळ मर्यादेचे उल्लंघण करणार्‍या नऊ प्रतिष्ठांनावर पोलिसांची धडक कारवाई : मास्क न लावलेल्या 103 भुसावळकरांकडून प्रत्येकी पाचशे रुपयांप्रमाणे दंड वसुल

भुसावळ : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने कडक निर्बंध जारी केल्यानंतर भुसावळात त्याची काटेकोर अंमलबजावणी पोलिस व स्थानिक प्रशासनाकडून करण्यात आली. शुक्रवारी रात्री नऊ वाजेनंतर प्रतिष्ठाने सुरू ठेवणार्‍या आठ व्यावसायीकांवर पोलिस प्रशासनाने कारवाई केली तर थर्टी फस्टचा जल्लोष करणार्‍या 11 मद्यपींची झिंगही पोलिसांनी उतरवली तर मास्क न लावणार्‍या 103 भुसावळकरांकडून प्रत्येकी पाचशे रुपयांप्रमाणे दंड वसुल करण्यात आला. सरत्या वर्षाला निरोप व नववर्षाच्या स्वागतासाठी मोठ्या संख्येने बाहेर पडल्यास जमावबंदीचे उल्लंघण केल्यास कायदेशी कारवाईचा इशारा पोलिस प्रशासनाने दिल्याने अनेकांनी नियोजित पार्टीचे बेत रद्दच करीत कुटुंबियांसोबतच थर्टी फस्ट साजरा केल्याचे दिसून आले.

खाद्य पदार्थांच्या दुकानांवर गर्दी
सरत्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी शहरातील व्यावसायिकांनी दुकाने सजवली होती. विशेष करून केक, खाद्यपदार्थ विक्रीची दुकाने, हॉटेल, चायनीज, पाणीपुरी, भेळपुरी, रगडा पेटीसची दुकाने सकाळपासून गजबजली होती तर रात्री नऊ वाजेपर्यंत या दुकानांवर मोठी गर्दीही दिसून आली.

11 मद्यपी वाहन चालकांची उतरवली झिंग
थर्टी फर्स्टला मद्यपान करून वाहन चालवताना अपघाताच्या घटना घडतात. या प्रकारांवर पायबंद लावण्यासाठी पोलिसांनी ड्रंक अँड ड्राइव्हच्या केसेस करण्यासाठी ब्रिथ अ‍ॅनालायझरचा उपयोग केला. काही वाहनधारकांना दवाखान्यात नेऊन तपासणी केली. यासाठी डॉ.मयूर चौधरींसह चार वैद्यकीय अधिकार्‍यांचे पथक नियुक्त केले होते. 11 मद्यपींवर कारवाई करण्यात आली.

या भागात करण्यात आली नाकाबंदी
खडका रोड, नाहाटा चौफुली, रजा टॉवर चौक, जळगाव नाका, गांधी पुतळा. हंबर्डीकर चौक, बाजारपेठ पोलिस ठाणे, अष्टभुजा देवी मंदिर, बसस्थानक, रेल्वे स्थानक परीसरात वाहनांची तपासणी करण्यात आली. डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे, निरीक्षक प्रताप इंगळे, दिलीप भागवत यांनी आपापल्या कार्यक्षेत्रात गस्तीचे नियोजन केले होते. राज्य उत्पादन शुल्क विभागातर्फे निरीक्षक सुजित कपाटे यांनी भुसावळ, यावल, रावेर, मुक्ताईनगर या तालुक्यात भरारी पथके नेमण्यात आली.