भुसावळात दरोडा टळला ; पाच आरोपी जाळ्यात

भुसावळ बाजारपेठ पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी : गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता

भुसावळ : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावरील नाहाटा चौफुलीवर शस्त्रांच्या धाकावर ट्रक चालकांना लुटण्याच्या प्रयत्नातील पाच जणांच्या दरोडेखोरांच्या टोळीला गस्तीवरील बाजारपेठ पोलिसांनी अटक करीत दरोड्याचा डाव उधळला. अटकेतील आरोपींमध्ये एका अल्पवयीनाचा समावेश असून बाजारपेठ पोलिसात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. अटकेतील आरोपींच्या चौकशीत गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. दरम्यान, आरोपींना न्यायालयात हजर केले असता एका दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

गस्तीवरील पोलिसांनी आवळल्या मुसक्या
बाजारपेठ पोलिसांचे पथक गस्तीवर असताना एका ट्रक चालकाने काही मुले ट्रक लुटीच्या उद्देशाने नाहाटा चौफुलीवरील उड्डाणपुलावर वरणगावच्या दिशेने लपून असल्याची माहिती दिल्यानंतर पोलिसांनी सोमवारी पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास धाव घेतली. यावेळी अंधाराचा फायदा घेत दोन संशयीत दुचाकीने पसार झाले तर तीन संशयीतांचा मुसक्या आवळण्यात यश आले. संशयीतांना बाजारपेठ पोलीस ठाण्यात आणल्यानंतर त्यांनी पसार सहकार्‍यांनी नावे दिल्यानंतर त्यांच्याही मुसक्या आवळण्यात आल्या. अटकेतील आरोपींमध्ये अक्षय वसंत कुलकर्णी (23, लक्ष्मी नारायण नगर, न्यू विवेकानंद नगर, भुसावळ), कुणाल प्रकाश तिवारी (27, शांती नगर, भुसावळ) तसेच आवेश शेख व मुज्जमील शेख (दोन्ही रा.भुसावळ) यांचा समावेश आहे. आरोपींविरोधात कॉन्स्टेबल विनोद नारायण डोळे यांच्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला.

आरोपींकडून दरोड्याचे साहित्य जप्त
अटकेतील आरोपींकडून पाचशे रुपये किंमतीचा 32 सेंटीमीटर लांबीचा चाकू, शंभर किंमतीचा व दहा सेंटीमीटर लांबीचा चाकू, 20 हजार रुपये किंमती दुचाकी (एम.एच.49 ए.ए.1433) दुचाकी, नॉयलॉन दोरी, 700 रुपयांची रोकड जप्त करण्यात आली.

यांच्या पथकाने आवळल्या मुसक्या
पोलिस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहा.निरीक्षक कृष्णा भोये, कॉन्स्टेबल विनोद नारायण डोळे, कॉन्स्टेबल योगेश माळी, कॉन्स्टेबल बंटी कापडणे, कॉन्स्टेबल चेतन ढाकणे, रवींद्र तायडे, प्रणय पवार, किशोर कुमावत, होमगार्ड संदीप सोनवणे, होमगार्ड विजय कांबळे, होमगार्ड लिलाधर कपले आदींच्या पथकाने आरोपींना अटक केली. तपास सहा.निरीक्षक मंगेश गोंटला, गजानन वाघ करीत आहेत.