भुसावळात दिव्यांग निधीपासून लाभार्थी वंचित : माहिती अधिकारात बाब उघड

भुसावळ : केंद्र शासनाच्या नि:समर्थ अर्थात दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम 2016 नुसार नगरपालिका क्षेत्रातील दिव्यांग व्यक्तींसाठी पाच टक्के राखीव निधी ठेवून अनुदान स्वरुपात दिला जातो मात्र पालिकेने सन 2016- 2017 ते 2019 -20 दरम्यान निधीची तरतुद असतानाही दिव्यांगांना हा निधी दिला नाही. केवळ दोन वर्षांत 45 लाख 62 हजार रुपयांचा निधी दिला असल्याची गंभीर बाब भाजप वैद्यकीय आघाडीचे उत्तर महाराष्ट्र सहसंयोजक डॉ. नी. तू. पाटील यांनी माहिती अधिकारातून मिळालेल्या माहितीतून समोर आली आहे.

635 लाभार्थींना निधीचे वितरणच नाही
पालिकेकडे दिव्यांग निधीत सन 2016 – 17 मध्ये 26 लाख 30 हजार 500 रुपये, सन 2017 -18 मध्ये 23 लाख 13 हजार रुपये, सन 2018-19 मध्ये 21 लाख 61 हजार रुपये, सन 2019 -20 मध्ये 48 लाख रुपये इतका राखीव निधीह होता. यासाठी तरतुदही करण्यात आली होती. मात्र केंद्र शासनाने दिलेल्या निर्देशानुसार शहरातील 635 लाभार्थींना या रक्कमेचे वितरण करण्यात आले नाही. केवळ सन 2020-2021 व सन 2021-2022 मध्ये अनुक्रमे 16 लाख 52 हजार व 29 लाख 10 हजार अशी एकूण 45 लाख 62 हजार रुपयांचे वितरण करण्यात आले. सन सन 2020-21 मध्ये या योजनेतून 494 तर सन 2021-22 मध्ये 635 लाभार्थीना लाभ मिळाला आहे. या दोन्ही वर्षांत वितरण करुनही पालिकेकडे निधीची शिल्लक तरतुद कायम आहे. केंद्र शासनाने दिलेले नियम डावलून पालिकेने सन 2016 ते 2020 पर्यंतच्या चार वर्षांच्या दरम्यान दिव्यांगांना दमडीही दिली नाही. 2020-21 मध्ये केवळ एक चतुर्थांश व सन 2021-22 मध्ये केवळ अर्धा निधीच खर्च केला आहे. केंद्रात भाजपची सत्ता आहे, वारंवार केंद्र सरकारच्या योजना तळागाळात पोहचविण्याच्या वल्गना केल्या जातात, मात्र भाजप सत्ताधार्‍यांनाच या योजना तळागाळात पोचविण्याचा विसर पडल्याचे यातून समोर येत आहे.

वरीष्ठ पातळीवर तक्रार करणार
शासनाच्या नियमांनुसार पाच टक्के निधी दिव्यांगांना दारीद्य्र निर्मूलन योजनेंतर्गत राखीव ठेवून हा निधी दिव्यांगांचा आर्थिक स्तर उंचावण्यासाठी उपयोगात आणावा लागतो मात्र या योजनेतून सुरवातीच्या चार वर्षांत पालिकेने दमडीही खर्च केली नाही. उर्वरीत दोन वर्षांत अनुदान दिले मात्र 100 टक्के विनियोग केला नाही. तब्बल 20 लाख 90 हजार रुपयांचा निधी शिल्लक आहे. या प्रकरणी आता वरीष्ठ पातळीवर तक्रार करणार असल्याचे भाजप वैद्यकिय आघाडीचे उत्तर महाराष्ट्र सहसंयोजक डॉ.नी.तू.पाटील म्हणाले.