भुसावळात दुसर्‍या दिवशीही 176 ब्रास वाळूचे साठे सापडले

भुसावळ : जळगावातील माहिती अधिकार कार्यकर्ता दीपककुमार गुप्ता यांच्या लेखी तक्रारीनंतर महसूलप प्रशासनाने गुरुवारी 16 ठिकाणी धाडी टाकत अवैधरीत्या साठवलेल्या वाळूचे पंचनामे केले होते तर शुक्रवारी पुन्हा महामार्गावरील पाण्याच्या टाकीजवळ आणि शिवपूर कन्हाळा रोडवर दहा वाळूचे अवैध साठे सापडल्याने वाळू तस्करांच्या गोटात प्रचंड अस्वस्थता पसरली आहे.

दहा ठिकाणच्या साठ्यांचा पंचनामा
शुक्रवारी सुध्दा नायब तहसीलदार इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली तलाठी पवन नवगाळे, विनोद बारी, मिलिंद तायडे यांनी शिवपूर कन्हाळा रोडवर नऊ ठिकाणी पडलेल्या वाळूच्या साठ्यांची तपासणी करून त्यांचे पंचनामे केले. तर महामार्गावरील पाण्याच्या टाकीजवळ सुध्दा एक वाळूचा साठा मिळून आला आहे. महसूल विभागाच्या कर्मचार्‍यांनी रीतसर पंचनामे करीत वाळू मालकाला लेखी पत्र देत ती वाळू त्यांच्या ताब्यात दिली. दरम्यान, सलग दोन दिवस चाललेल्या कारवाईनंतर उभयंतांना आता महसूल प्रशासन नोटीस बजावणार असून त्यानंतर आलेल्या खुलाशाचे अवलोकन करून कारवाईची दिशा ठरवली जाणार आहे.

अवैध वाळूमागे मोठे अर्थकारण
शहरात मध्यरात्रीच्या सुमारास मोठ्या प्रमाणावर अवैधरीत्या वाळू डंपद्वारे दाखल होत आहे. कारवाईची जवाबदारी असलेली महसूल यंत्रणा, तलाठी, मंडळाधिकारी तसेच पोलिस प्रशासन मात्र हा प्रकार निमूटपणे पाहत असल्याने यामागे मोठे अर्थकारण असल्याचा आरोप पर्यावरण प्रेमी करीत आहेत. जिल्हाधिकार्‍यांनी अवैध वाळू वाहतुकीवर अंकुश लावावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.