भुसावळात दुसर्‍याच उमेदवाराला मतदानाची तक्रार करणार्‍या तरुणाला अटक

0

टेक्स व्होटमध्ये तरुणाची तक्रार निघाली खोटी ; मतदान केंद्र 37 वरील प्रकार

भुसावळ- रावेर लोकसभा निवडणुकीसाठी मंगळवारी शांततेत मतदान प्रक्रिया पार पडत असतानाच शहरातील नॉर्थ रेल्वे हायस्कूलवरील मतदान केंद्र क्रमांक 37 वर एका 25 वर्षीय तरुण मतदाराने आपण केलेले मतदान इच्छूक उमेदवाराऐवजी दुसर्‍याच उमेदवाराला झाल्याची तक्रार स्थानिक केंद्रप्रमुखांना केल्यानंतर मतदान केंद्रात प्रचंड खळबळ उडाली. यावेळी उपस्थित अधिकार्‍यांना संबंधित तरुणाला मतदान प्रक्रिया पारदर्शी पद्धत्तीने होत असल्याची समज दिल्यानंतर तरुण ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्याने अखेर तातडीने मतदान प्रक्रिया थांबवण्यात आल्यानंतर उपस्थित अधिकार्‍यांसमक्ष टेस्ट व्होट घेण्यात आल्यानंतर तरुणाने केलेला आरोप धादांत खोटा निघाल्याने तरुणाला पोलिसांच्या ताब्यात दिल्यानंतर त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यास अटक करण्यात आली. अमोल रामदास सुरवाडे (24, चांदमारी चाळ, भुसावळ) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.

व्हीव्हीपॅट मशीनवरच तरुणाचा आक्षेप
यंदाच्या लोकसभा निवडणुकीत प्रथमच ईव्हीएमसोबत व्हीव्हीपॅट मशीन जोडण्यात आल्याने इच्छूक मतदाराने आपल्या पसंतीच्या उमेदवाराला मतदान केल्यानंतर दहा सेकंदांपर्यंत व्हीव्हीपॅटमध्ये पक्षचिन्हाची छबी दिसत असल्याने पारदर्शीपणे निवडणूक पार पडत आहेत मात्र शहरातील नॉर्थ रेल्वे हायस्कूल बूथ क्रमांक 37 वर अमोल रामदास सुरवाडे (24, चांदमारी चाळ, भुसावळ) हा तरुण मंगळवारी सकाळी साडे नऊ वाजेच्या सुमारास आल्यानंतर त्याने आपला हक्क बजावला मात्र व्हीव्हीपॅटमध्ये आपण केलेल्या उमेदवाराऐवजी दुसर्‍यालाच मतदान झाल्याची तक्रार या तरुणाने केली. यावेळी केंद्र प्रमुखांसह अन्य अधिकार्‍यांच्या उपस्थितीत तरुणाचा टेस्ट व्होटसाठी फार्म भरून घेण्यात आला व अधिकार्‍यांच्या समक्ष मतदान प्रक्रिया राबवण्यात आल्यानंतर त्यात तरुण करीत असलेला आरोप खोटा निघाल्याने त्याच्याविरुद्ध केंद्रप्रमुख योगेश्‍वर दिलीप चौधरी (28, खिरवाड, ता.रावेर) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार भुसावळ शहर पोलिसात दुपारी 12.43 वाजेच्या सुमारास भादंवि 177, 171 (फ), लोकप्रतिनिधी कायदा 1951 कलम 26 प्रमाणे गुन्हा दाखल करून त्यास अटक करण्यात आली.

अधिकार्‍यांनी घेतली धाव
तरुण मतदाराने केलेल्या तक्रारीची निवडणुकीतील वरीष्ठ अधिकार्‍यांसह पोलिस प्रशासनाला माहिती कळताच पोलिस उपअधीक्षक गजानन राठोड, शहरचे पोलिस निरीक्षक बाबासाहेब ठोंबे आदींनी धाव घेत माहिती जाणून घेतली.