तहसील कार्यालयाला छावणीचे स्वरूप ; तपासणीनंतर सेट सीलबंद
भुसावळ- रावेर लोकसभेच्या निवडणुकीसाठी शहरातील तहसील कार्यालयाच्या गोदामात बॅलेट युनिट व कंट्रोल युनिट दाखल असून त्यांची तज्ज्ञांमार्फत दुसर्या टप्प्यात तपासणी सुरू करण्यात आली आहे. महिनाभर हे काम चालणार असून त्यासाठी भेल कंपनीतील तज्ज्ञांसह जिल्ह्यातील अधिकारी दाखल झाले आहेत.
चार हजार 354 व्हीव्हीपॅट मशीन दाखल
तहसीलच्या गोदामात दाखल झाले आहेत. या सर्व यंत्रांची ऑनलाईन तपासणी व संगणीकृत माहिती यापूर्वीच सॉप्टवेअरमध्ये अपलोड करण्यात आली आहे. मतदानावेळी याच यंत्राना जोडले जाणारे चार हजार 354 व्हीव्हीपॅट मशीन तहसीलमधील निवडणूक विभागाकडे प्राप्त झाले आहेत. या व्हीव्हीपॅट यंत्राची सोमवारपासून कडेकोट बंदोबस्तात तपासणी सुरू झाली आहे. या कामासाठी निवडणूक विभागाचे उपजिल्हाधिकारी प्रमोद भामरे, तहसीलदार सुरेश थोरात, भुसावळ विभागाचे प्रांताधिकारी डॉ.श्रीकुमार चिंचकर, तहसीलदार भाऊसाहेब थोरात, नायब तहसीलदार विजय भालेराव, पाचोरा विभागाचे प्रांताधिकारी राजेंद्र कचरे, पाचोरा तहसीलदार बंडू कापसे, यांच्यासह अन्य अधिकारी, कर्मचारी, तलाठी, आयटीआयचे तंत्रनिदेशक तसेच भेल कंपनीचे नऊ अभियंत्यांचे पथक व्हीव्हीपॅट मशीनची तपासणी करत आहे. तपासणी करतांना व्हीव्हीपॅट मशीन बॅलेट व कंट्रोल युनिटला जोडले जाते. त्यावर प्रायोगिक पद्धतीने मतदान केले जाते. तीनही यंत्रांची तपासणी पूर्ण झाल्यानंतर तो सेट सिलबंद केला जातो. यंत्रांच्या तपासणीसाठी निवडणूक विभागाकडून महिनाभराचा स्वतंत्र नियोजन आराखडा तयार करण्यात आला आहे, अशी माहिती निवडणूक विभागाचे नायब तहसीलदार विजय भालेराव यांनी दिली. दरम्यान, तहसीलच्या गोदामात सात हजार 488 बॅलेट युनिट तर चार हजार 354 कंट्रोल युनिट प्राप्त झाले आहेत. सर्व यंत्रांची तपासणी पुर्ण झाली आहे. यात पुन्हा चार हजार 354 व्हीव्हीपॅट यंत्रांची भर पडली आहे. शासकीय गोदामात तपासणी केलेल्या सर्व यंत्रांची क्रमांकानुसार मांडणी करण्यात आली आहे.