दोघा आरोपींविरुद्ध गुन्हा, एकास अटक ; पीडीतेच्या आईवर आरोपीकडून चाकूने हल्ला
भुसावळ- शहरातील सेंट्रल रेल्वे प्रायमरी स्कूलच्या दोन अल्पवयीन विद्यार्थिनींना चाकूच्या धाकावर जीवे ठार मारून टाकण्याची धमकी देत दोन तरुणांनी दुचाकीवर बळजबरीने पळवून अपहरण केल्याची घटना बुधवारी दुपारी दिड वाजेच्या सुमारास घडल्याने शहरात खळबळ उडाली. दरम्यान, आरोपींनी काही वेळेनंतर दोघा तरुणांनी या विद्यार्थिनींना शाळेजवळ सोडत असतानाच पीडीतेच्या आईच्या हातावर चाकूने हल्ला केला. या प्रकरणी दोघा संशयीतांविरुद्ध पोस्को व पळवून नेल्याच्या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून एका आरोपीस अटक करण्यात आली आहे.
शाळेतून विद्यार्थिनींचे अपहरण
शहरातील रेल्वेच्या सेंट्रल रेल्वे प्रायमरी स्कूलमध्ये नववीत शिकणार्या दोन विद्यार्थिनींचा संशयीत आरोपी मनीष रवींद्र ठाकूर (गंगाराम प्लॉट, भुसावळ) व अर्जुन विजय सपकाळे (सात नंबर चौकीजवळ, भुसावळ) यांनी पाठलाग केला व बुधवारी दुपारी दिड वाजेच्या सुमारास दोघाही पीडीत तरुणींना दुचाकीवर बसवून पोद्दार शाळेमागे नेले व काही वेळानंतर पुन्हा शाळेच्या प्रांगणात सोडले. याचवेळी पीडीत विद्यार्थिनीचे आई-वडिल आल्यानंतर त्यांनी तरुणांना हटकल्यानंतर आरोपी मनीष ठाकूरने एका विद्यार्थिनीच्या आईच्या डाव्या हातावर चाकूने हल्ला केल्याने त्या जखमी झाल्या. या प्रकरणी आरोपी मनीष ठाकूर यास अटक करण्यात आली असून दुसरा संशयीत पसार झाला आहे. तपास पोलिस निरीक्षक बाबासाहेब ठोंबे यांच्या मार्गदर्शनाखाली एएसआय संजय कंखरे करीत आहेत.