भुसावळात दोन घरफोड्यांनी खळबळ

0

बाजारपेठ पोलिसांची गस्त भेदत चोरटे सैराट ; चोरट्यांकडून बंद घरांना टार्गेट

भुसावळ- पोलिसांची गस्त भेदत बंद घरांना फोडण्याचे सत्र शहरात कायम आहे. वाढत्या चोर्‍या रोखण्यात पोलिस प्रशासन सपशेल अपयशी ठरल्याने नागरीकांमधून संताप व्यक्त होते आहे. शहरातील शिवपूर कन्हाळा मार्गावरील अमृत कॉलनी दोन बंद घरांना फोडत चोरट्यांनी चैनीच्या वस्तूंसह रोकडवर डल्ला मारला. दरम्यान, शहरात गत महिन्यांपासून सातत्याने चोरीसह घरफोडीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे मात्र पोलिसांकडूनही एकही गुन्हा उघडकीस येत नसल्याचे चित्र आहे.

दोन बंद घरे फोडली
शिवपूर कन्हाळा मार्गावरील अमृत कॉलनीत प्रा.डॉ.दीपक हिवराळे व आशीष निरखे राहतात. दोन्ही कुटुंब गावाला गेल्याची संधी साधत चोरट्यांनी 26 मे ते 6 जून या काळात दोन्ही बंद घरांचा कडी-कोयंडा तोडत प्रवेश केला. हिवराळे यांच्या घरातील होम थिएटर, टॅब फोन, दोन स्पिकर, दोन एलसीडी टीव्ही, तीन घड्याळे व पाच हजार रुपये रोख तसेच त्यांचे शेजारी आशीष निरखे यांचाही बंद घराचा कडीकोयंडा तोडत चोरट्यांनी त्यांच्या घरातून दोन हजार रुपये रोख व एक गॉगल चोरून नेला. दोन्ही मिळून 50 हजार 300 रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लांबविल्याचा प्रकार गुरूवारी सायंकाळी उघडकीस आला. याप्रकरणी बाजारपेठ पोलिस ठाण्यात प्रा.हिवराळे यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.