शालेय विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी निर्माण होतेय अडचण
भुसावळ- खडका रोडवर असलेल्या नगरपालिका शाळा क्रमांक 28 च्या आवारात बांधकाम साहित्य टाकण्यात आल्याने शालेय विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी अडचण निर्माण होत असून शिवाय अस्वच्छताही निर्माण होत आहे. या प्रकारामुळे पालकवर्गामध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे. बांधकामाचे साहित्य शहरातीलच एका बांधकाम व्यावसायीकाचे असल्याचे सांगण्यात येत आहे. गत सहा वर्षांपासून शाळेच्या आवाराचा बांधकामासाठी लागणारी खडी आणि वाळू टाकण्यासाठी वापर केला जात आहे मात्र पालिका प्रशासनाचे या प्रकाराकडे दुर्लक्ष होत असल्याने संताप व्यक्त होत आहे. यामुळे नगरपालिकेच्या शिक्षण विभागाने याची दक्षता घेणे आवश्यक झाले आहे.
अस्वच्छता निर्माण होते
शहरातील खडका रोडवरील नगरपालिका हिंदी शाळा क्रमांक 28 असून या शाळेत परीसरातील विद्यार्थी ज्ञानार्जनाचे धडे गिरवण्यासाठी येतात मात्र त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. शाळेच्या आवाराला कुंपण नसल्याने दिवसा व रात्री शाळेच्या आवारात आणि व्हरांड्यात टारगटांचा वावर असतो. यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अस्वच्छता निर्माण होत असल्याने शिक्षकांसह विद्यार्थ्यांना अडचणीचा सामना करावा लागत असल्याने संताप व्यक्त केला जात आहे.
आवाराचा बांधकाम साहित्य ठेवण्यासाठी वापर
शाळेच्या आवाराला कुंपण नसल्याने शाळेच्या आवाराचा मोठ्या प्रमाणात दगडी गिट्टी, वाळू व इतर असे साहित्य ठेवण्यासाठी वापर केला जात आहे. यामुळे शालेय विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी कुठल्याही प्रकारची जागा शिल्लक राहत नसल्याने विद्यार्थ्यांना शालेय क्रीडांपासून वंचित रहावे लागत आहे.
पालिकेच्या शिक्षण विभागाने दक्षता घेण्याची आवश्यकता
आधीच खाजगी शाळांच्या तुलनेत नगरपालिकेच्या शाळांना विद्यार्थ्यांअभावी घरघर लागली आहे तर काही शाळा बंदावस्थेत आल्या असल्याने नगरपालिकेच्या शिक्षण विभागाने मरगळ झटकून पालिकेच्या शाळांमध्ये अत्याधुनिक साहीत्य व स्वच्छतेला प्राधान्य देणे गरजेचे झाले आहे.शिवाय शाळांमधील शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी दक्षता घेण्याची आवश्यकता निर्माण झाली असून शाळेच्या इमारतींची दुरावस्था झाली आहे.
आवाराला गवतांचाही वेढा
पावसाळ्याचे दिवस असल्याने शाळेच्या आवारात मोठ्या प्रमाणात गवताचे प्रमाण वाढत आहे. अशा गवतामुळे सरपटणार्या विषारी प्राण्यांचा विद्यार्थ्यांच्या जिवाला धोका निर्माण होवू शकतो. याकडे शालेय प्रशासनाने वेळीच लक्ष देण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. अन्यथा एखाद्या विद्यार्थ्यांच्या जिवीतास धोका निर्माण झाल्यास या घटनेला कोण जबाबदार राहील ? असा प्रश्न असून याचीही पालीका प्रशासनाने दखल घेणे आवश्यक आहे.