भुसावळ- शहरातील प्रभाग क्रमांक 18 च्या जनआधार विकास पार्टीच्या नगरसेविका मीनाक्षी नितीन धांडे यांनी पदरमोड करून प्रभागातील नागरीकांसाठी 15 हजार रुपये खर्चून चार ढापे बसवल्याने नागरीकांनी समाधान व्यक्त केले. शहरात सत्ताधारी व विरोधी नगरसेवकांच्या वॉर्डात विकासकामे केली जात असल्याचे सत्ताधारी सांगत असलेतरी विरोधी नगरसेवकांना मात्र पदरमोड करून कामे करण्याची वेळ आली आहे. प्रभाग 18 मध्ये जनआधारच्या नगरसेविका मीनाक्षी धांडे व सामाजिक कार्यकर्ते नितीन धांडे यांनी 15 हजार रुपयांतून चार ढाप्यांचे काम नुकतेच पूर्ण केले.
प्रभाग 18 मधील गटारींवरील ढापे तुटल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण झाला होता. याबाबत पालिकेकडे वारंवार दुरुस्तीची मागणी करूनही प्रतिसाद मिळत नसल्याने नागरीकांची सोय होण्यासाठी नगरसेविका मीनाक्षी धांडे, नितीन धांडे यांनी स्वत: 15 हजार रुपये खर्च करून ढापे दुरुस्तीचे काम पूर्ण केले. प्रभाग 18 मधील गंगाराम प्लॉट भागातील मित्र मंडळ, सत्कार मंडळ, शिवराय मंडळ व आनंद मंडळाच्या मागील भागातील गटारींवर तुटलेल्या ढाप्यांची दुरुस्ती करण्यात आली. प्रभागातील अनेक कामे स्वखर्चातून करत असून त्यामागे नागरीकांना सेवा देण्याचा हेतू असल्याचे नगरसेविका मीनाक्षी धांडे व नितीन धांडे म्हणाले.