शिवसेना पदाधिकार्यांच्या आंदोलनामुळे वीज कंपनी कर्मचार्यांमध्ये खळबळ ; उपकरणे बंद मात्र वीज बिल भरमसाठचा अनुभव
भुसावळ- विजेचे लॉसेस वाढल्याने वीज कंपनीने जुने विद्युत मीटर बदलवून नवीन आर.एफ.मीटर बसविण्यास सुरूवावत केली असलीतरी नवीन मीटरचा वेग अधिक असल्याने ग्राहकांना जास्तीची बिले मिळत असल्याच्या तक्रारी वाढल्यानंतर मंगळवारी सकाळी 10 वाजता कार्यकारी अभियंता प्रदीप घोरूडे यांच्या कार्यालयात धाव घेतली मात्र ते नसल्याने अतिरिक्त अभियंता व्ही.बी.पाटील यांच्या कार्यालयात दिड तास पदाधिकार्यांनी ठिय्या मांडला. दरम्यान, अतिरीक्त वीज बिल येणार्या ग्राहकांच्या वीज मीटरची चौकशी करण्यासह पूर्वसूचना न देता खंडित झालेल्या वीजपुरवठ्याप्रकरणी चौकशीचे आश्वासन पाटील यांनी दिले. शिवसेनेच्या या आंदोलनामुळे मात्र वीज कंपनी कर्मचार्यांमध्ये खळबळ उडाली.
नवीन आरएफ मीटर सुसाट
वीज वितरण कंपनीने जुने मीटर बदलण्यासोबतच दोन तीन वर्षांपूर्वी बसविण्यात आलेले मीटरही बदलले आहेत. विजेचा लॉस कमी होईल, अशी आशा वीज कंपनीला असलातरी नवीन विद्युत मीटर सेन्सिटिव्ह असल्याने घरातील जुनी वायरींग, जुने फ्रीज व घरगुती मोटार यात किंचितसा बिघाड असल्यास सुद्धा हे मीटर फिरत असल्याचा अनुभव आहे. परीणाम वीज ग्राहकांना भरमसाठ वीज बिले मिळत असल्याच्या तक्रारी आहेत. बर्याचदा उपकरणे बंद असतानाही मीटरचे युनिट पुढे पडत राहतात , अशाही नागरिकांच्या तक्रारी आहे.
दररोज शंभराहून अधिक तक्रार
महावितरणने विजेचा काटेकोर हिशेब ठेवण्यासाठी योजिलेला हा उपाय सामन्यांच्या खिशाला नाहक कात्री लावणारा आहे. त्यामुळे मीटर बदलविताच ग्राहकांना हजारो रुपयांचे विद्युत देयक येत असल्याने ग्राहकांमध्ये तीव्र असंतोष खदखदत आहे. महावितरण कंपनीतर्फे बसवण्यात आलेले मीटर दोषपूर्ण आहेत या नागरीकांच्या आक्षेपाला दररोज कंपनीकडे याबाबत येणार्या तक्रारींचे वाढलेल्या प्रमाणामुळे पुष्टी मिळत आहे. भरमसाठ वीज देयकांच्या तक्रारी घेवून येणार्या ग्राहकांची प्रतीदिन सरासरी संख्या शंभरहून अधिक असल्याची माहिती दक्षिण विभागाचे शहर प्रमुख बबलू बर्हाटे यांनी संबंधित अधिकार्याना दिली.
नोटीस न दिल्यास तीव्र आंदोलन
विद्युत ग्राहकांना एप्रिल-मे महिन्यात हजारो रुपयांचे देयक देण्यात आले आहे. सद्यस्थितीत विजेचा वापर वाढत आहे. नवीन मीटरमुळे दुप्पट देयक आकारली जात आहे. वीज कंपनीने यात तातडीने सुधारणा करावी अन्यथा जुनेच मीटर पुन्हा बसवावेत, अशी मागणी आहे. ग्राहकांना रीतसर पद्धतीने वीज बिल कमी करून द्यावे तसेच वीज तोडणी करतांना नोटीस दिलीच पाहिजे अन्यथा शिवसेनेतर्फे मोठे आंदोलन पुकारले जाईल असा इशारा तालुका प्रमुख समाधान महाजन यांनी दिला.
वीज कंपनीच्या दिव्याखाली अंधार
संपूर्ण भुसावळ शहरात नवीन वीज मीटर बसविले जात आहेत परंतु महावितरणच्या संबधित असलेल्या एकाही कार्यालयात नवीन मीटर बसवले गेले नाहीत. संपूर्ण शहराला नवीन मीटर बसवण्याचे आवाहन करणार्या महावितरणच्या अधिकार्यांना त्यांच्याच ऑफिस मधील जुने मीटर दिसले नाहीत का? असा प्रश्न प्रा.धीरज पाटील यांनी उपस्थित केला. ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे तक्रार करणार असल्याचेही ते म्हणाले. दरम्यान, ठिय्या आंदोलनप्रसंगी शिवसेना पदाधिकारी समाधान महाजन, प्रा. धीरज पाटील, संतोष सोनवणे, बबलू बर्हाटे, हिरामण पाटील, नबी पटेल, योगेश बागुल, विक्की चव्हाण, सुरज पाटील, मनोज पवार, मयुर जाधव, विनोद गायकवाड, शेख मेहमूद, स्वप्नील सावळे, निखील बर्हाटे व ग्राहक उपस्थित होते.