माजी मंत्री एकनाथराव खडसेंसह खासदारांनी केली जागेची पाहणी
भुसावळ- शहरातील एमआयडीसीमध्ये आयआरसीटीसीच्या माध्यमातून रेल नीर प्रकल्पाची नवीन वर्षात मुहूर्तमेढ होत असून या प्रकल्पाच्या माध्यमातून अनेकांच्या हाताला रोजगारही प्राप्त होणार आहे. शनिवारी माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्यासह खासदार रक्षा खडसे यांनी जागेला भेट दिली. जंक्शन स्थानकावर प्रवाशांना रेल नीर प्रकल्पाच्या पाण्याच्या बाटल्यांचीच विक्री व्हायला, असा नियम आहे.
नवीन वर्षात प्रकल्प सुरू होण्याची आशा
भुसावळातील एमआयडीसी परीसरात आयआरसीटीसीच्या माध्यमातून भुसावळ येथे पाणी बंद बाटलीचा रेल नीर प्रकल्प सुरू होत असून या प्रकल्पाला 2018 मध्ये मंजूरी मिळाली. आठ हजार 553 स्वेअर मीटरवर हा प्रकल्प तयार केला जात असून फेब्रुवारी महिन्यातच प्रकल्पाच्या कामाला सुरूवात झाली. डिसेंबर 2019 मध्ये हा प्रकल्प सुरू केला जाणार होता मात्र पाऊस असल्याने रस्त्याचे काम अपूर्ण राहिले. आता जानेवारी महिन्यात हा प्रकल्प कार्यान्वीत करण्याचे नियोजन आयआरसीटीसीचे नियोजन आहे. प्रकल्पात 24 तासात 72 हजार पाण्याच्या सीलबंद बाटल्या बाहेर पडणार आहे. त्याच बाटल्या रेल्वे स्थानकांवर विक्री होणार आहे. भुसावळसह विभागातील विविध रेल्वे स्थानकांसह अन्य विभागातही याच पाण्याच्या बाटल्यांचे वितरण होणार असल्याचे खडसे यांना सूत्रांनी सांगितले. प्रसंगी पंचायत समितीच्या सभापती प्रीती पाटील, भाजपा संघटन सरचिटणीस प्रा.सुनील नेवे, मुरलिधर (गोलू) पाटील आदींची उपस्थिती होती.