शहरातील विविध चर्चमध्ये झाली प्रभू येशू ख्रिस्त जन्माची आराधना
भुसावळ- नाताळ सणानिमित्त शहरातील आठही चर्चमध्ये सजावट करण्यात आली होती तर मंगळवारी विविध कार्यक्रमातून प्रभू येशू ख्रिस्तांची आराधना करून नाताळ सण साजरा करण्यात आला. सणानिमित्त चर्चवर आकर्षक रोशनाई करण्यात आली होती. शहरातील आठही चर्चमध्ये नववर्षापर्यंत अर्थात 1 जानेवारीपर्यंत विविध कार्यक्रहोणार आहेत.
भुसावळातील आठ चर्च सजले
शहरातील गार्ड लाईनवरील सिक्रेट हार्ट चर्च, रेल्वे दवाखाना आरपीडीरोडवरील सेंट पॉल चर्च, रेल्वे ऑफिसर बंगलो भागातील इन्नामुलम मराठी अलायन्स चर्च, फिल्टर हाऊस जवळील ब्लेस इंडिया मिशन चर्च, मुख्य पोस्ट कार्यालयाजवळील मराठी अलायन्स चर्च, वरणगावरोडवरील अॅसेंबल ऑफ गॉड चर्च, झेडटीसी भागातील आयएफजीएम चर्च आदींसह अन्य चर्चमध्ये नाताळाच्या निमित्ताने सकाळी प्रार्थना व प्रभु येशु ख्रिस्त यांचा जन्मोत्सव साजरा करण्यात आला. शहरातील विविध चर्चमध्ये सांताक्लॉज सोबत मुलांनी आनंदोत्सव साजरा केला. मनोरंजनात्मक खेळ व भेट वस्तू देऊन नाताळ सण साजरा करण्यात आला. चिकमुल्यांनी देखील सांताक्लॉजचा गणवेश व टोपी परिधान करून आनंद लुटला. शहरातील सर्व चर्चमध्ये सामूहिक प्रार्थना, प्रभु येशु ख्रिस्त यांचा जन्मोत्सव आदी कार्यक्रम पार पडले. सेंट पॉलचर्चमध्ये रेव्ह डायना गायकवाड व मराठी अॅलायन्स चर्चमध्ये पास्टर स्वप्निल नाशिककर यांच्या उपस्थितीत प्रार्थना झाली. 1 जानेवारीपर्यंत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
केक, भेटवस्तू, चॉकलेटला मागणी
नाताळनिमित्त विविध रंगांचे खास ख्रिसमस केक बाजारात विक्रीसाठी आल्याने खरेदीसाठी गर्दी झाली होती. तसेच, अंजीर, किवी, व्हाईट चॉकलेट स्ट्रॉबेरी या केकची विक्री झाली. ख्रिसमस ट्री, भेटवस्तू, ग्रिटींग व विशेष करुन आकर्षक पॅकींगमध्ये असलेल्या चॉकलेटच्या गिफ्टला देखील मोठी मागणी राहिली.