भुसावळात निमित्त राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या दौर्याचे ; साखर पेरणी मात्र निवडणुकांची !
दौर्यात प्रहार उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष अनिल चौधरींनी उमटवली छाप : दुचाकी रॅलीतून शक्ती प्रदर्शन
भुसावळ (गणेश वाघ) : भुसावळातील राजकीय पटलावर आजही चौधरी बंधूंच्या नावाचा दबदबा कायम असल्याचे राज्यमंत्री बच्चू कडूंच्या आजच्या दौर्यावरून दिसून आले. माजी आमदार संतोष चौधरी व माजी प्रभारी नगराध्यक्ष अनिल चौधरी यांच्या राजकीय विचारधारा वेगवेगळ्या असल्यातरी शहरातील उभयंतांचा दबदबा नेहमीच दिसून येतो. राज्यमंत्री बच्चू कडू शुक्रवारपासून जिल्ह्याच्या दौर्यावर आले असून मंत्र्यांचा हा दौरा आगामी निवडणुकांची नांदी असल्याचे म्हटल्यास वावगे ठरू नये. मंत्र्यांच्या स्वागतासाठी निघालेल्या रॅलीत हजारो दुचाकीस्वार सहभागी झाल्याने यातून प्रहार संघटनेने शहरात शक्तीप्रदर्शन करीत आगामी निवडणुकीसाठी प्रलहार ताकदीनिशी सज्ज असल्याचे दाखवून दिले.
‘प्रहार पक्ष’ ताकदीनिशी निवडणुका लढवणार
प्रहार पक्षात प्रवेश करताना अनिल चौधरी यांनी स्थानिक पालिका निवडणुकांसह भुसावळ विभागातील सर्वच नगरपालिका, नगरपंचायत तसेच आगामी जिल्हा परीषद व पंचायत समिती निवडणुका प्रहार पक्ष स्वबळावर लढणार असल्याचे वक्तव्य केले होते व त्यानुषंगाने शुक्रवारचा दौरा हा पक्षासाठी फलदायी ठरेल, असे मानले जात आहे. नगरपालिका व दीपनगर प्रशासनावर वचक निर्माण करण्यासाठी घेण्यात आलेली आढावा बैठक तालुक्यातील चर्चेचा विषय ठरली आहे. भुसावळ शहर व तालुक्यातील आगामी निवडणुका आघाडी करून वा स्वतंत्र पक्ष चिन्हाद्वारे लढवल्या जातात वा नाही हे काही महिन्यांअंती कळणार असलेतरी प्रहार पक्षाचे आता या सर्वच निवडणुकीत कडवे आव्हान असेल हे देखील तितकेच खरे ! शहरातील राजकीय पक्षांची खिचडी व राजकारण पाहता तरुण नेतृत्वाला देखील प्रहार पक्ष पर्याय म्हणून समोर आला आहे त्यामुळे आगामी काही दिवसात प्रहारमध्ये मोठ्या प्रमाणावर इनकमिंग वाढेल, असादेखील कयास आहे.
दौरा मंत्र्यांचा ; छाप चौधरी परीवाराची
राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या स्वागतासाठी संपूर्ण शहर सजल्याचे दिसून आले. शहरातील चौका-चौकात बॅनर्स व फलक लावून मंत्र्यांचे स्वागत करण्यात आले. मंत्र्यांच्या स्वागतासाठी जामनेर रोडवरील श्री साई मंदिर ते यावल रोडवरील सेंट अलॉयसीस शाळेपर्यंत काढण्यात आलेली दुचाकी रॅली शहरवासीयांचे आकर्षण ठरली. कार्यकर्त्यांनी राज्यमंत्री बच्चू कडू व उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष अनिल चौधरी यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करून शहरवासीयांचे लक्ष वेधले. ओपन जीपमध्ये राज्यमंत्र्यांसह चौधरी यांनी उभे राहून शहरवासीयांना अभिवादन केले व शहरवासीयांनी त्यांना शुभाशीर्वाद दिले.
प्रांताधिकारी कार्यालयातील बैठकीत ‘मुख्याधिकारी केंद्रस्थानी’
राज्यमंत्र्यांचा आजचा दौरा खर्या अर्थाने भुसावळ उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयात झालेल्या आढावा बैठकीनंतर चर्चेचा ठरला. या बैठकीत सर्वाधिक झपाई पालिका मुख्याधिकारी संदीप चिद्रवार यांची झाली तर अभियंत्यांनाही चांगलेच फैलावर घेण्यात आले. सर्वसामान्यांविषयी मुख्याधिकार्यांना आस्थाच नाही, त्यांना जेलमध्ये टाकायला हवे या राज्यमंत्र्यांनी दिलेल्या तंबीमुळे मोठी खळबळ उडाली. शासकीय योजना जनतेपर्यंत पोहोचत नाही, अधिकार्यांना शहरातील रस्त्यांची कामे माहिती नाही, केवळ ठेकेदारांची नावे माहिती आहे, असे सूचक वक्तव्य बच्चू कडू यांनी करीत मुख्याधिकार्यांसह अभियंत्यांचे निलंबनाचे प्रस्ताव पाठवा, अशी सूचना फैजपूर प्रांताधिकारी कैलास कडलग यांना केल्याने पालिका वर्तुळातील अधिकार्यांमध्ये आता धाकधूक निर्माण झाली आहे.
राज्यमंत्र्यांच्या फटकेबाजीनंतर अधिकार्यांनी व्हावे अंतर्मुख
सर्वसामान्यांना न्याय देण्याची भूमिका घेणार्या राज्यमंत्री बच्चू कडू मुख्याधिकार्यांना फुकटचा पैसा खाता, लाज वाटायला हवी, अशी तंबीच भर सभेत देत त्यांच्यावर कठोर शब्दात टिका केली. रमाई योजनेचे उद्दिष्ट पूर्ण न झाल्याने त्यांनी दलितांवर अत्याचार करता म्हणून तुमच्यावर अॅट्रासिटीच दाखल केली पाहिजे आणि अंदर (जेलमध्ये) टाकले पाहिजे, अशी तंबी देवून खळबळ उडवून दिली तर सर्वसामान्यांविषयीचा जिव्हाळा दाखवून दिला. सफाई कामगारांच्या पगारातील लोणी खाणार्या कंत्राटदाराविषयी त्यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त करीत चार महिन्यांचा फरक कर्मचार्यांच्या खात्यावर जमा करण्याच्या सूचना मुख्याधिकार्यांना करीत अहवाल मागितला. दरम्यान, मंत्री बच्चू कडू यांनी आता दर महिन्याला शहरात बैठक घ्यावी, असा सूर शहरवासी व्यक्त करू लागले आहेत.