पालिकेच्या धडक कारवाईनंतर व्यावसायीकांमध्ये प्रचंड खळबळ
भुसावळ : कोरोनाचा वाढता फैलाव व बाजारपेठेत होणारी गर्दी पाहता प्रांताधिकारी रामसिंग सुलाणे यांनी व्यावसायीकांना दुकाने उघडून द्यावयाचे दिवस ठरवून दिले आहेत शिवाय नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन केले आहे मात्र त्यानंतरही ठरवून दिलेल्या दिवशी दुकान न उघडता नियम मोडल्याने शहरातील तीन दुकानांना सील ठोकण्याची कारवाई शनिवारी पालिकेच्या पथकाने केल्याने व्यावसायीकांमध्ये खळबळ उडाली. प्रभारी मुख्याधिकारी किरण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
या दुकानांवर झाली कारवाई
शहरातील सियाराम कॉम्प्लेक्समधील जय वैष्णव माता प्रोव्हीजन, आठवडे बाजारातील जयहिंद बेकरी तसेच खडका रोडवरील एका इंजिनिअरींग वर्कशॉपला पालिकेच्या पथकाने सील ठोकले. पुढील आदेश येईपर्यंत आता व्यावसायीकांना दुकान उघडता येणार नाही शिवाय नियम मोडल्यास आणखी कठोर कारवाई होण्याचे संकेत सूत्रांनी दिले आहेत. दुकानांना सील ठोकण्याची कारवाई प्रशासकीय अधिकारी चेतन पाटील, अभियंता पंकज पन्हाळे, लेखापाल संजय बाणाईत, रामदास म्हस्के, किरण मनवाडे, राजू पाटील आदींच्या पथकाने केली.