जीवीत वा वित्तीयहानी झाल्यास घरमालकासह भाडेकरू जवाबदार
भुसावळ- शहरातील विठ्ठल मंदिर वॉर्डासह शहरातील अनेक भागात अनेक पडक्या इमारती असून पावसाळ्यात दुर्घटना झाल्यास जबाबदार कोण?असा प्रश्न उपस्थित होत आहे़ पालिकेने या संदर्भात दोन दिवसांपूर्वी प्रसिद्धी माध्यमाद्वारे पावसाळ्यात या इमारती कोसळून जिवीत वा वित्तीय हानी झाल्यास त्यास संबंधित घरमालकासह भाडेकरू जवाबदार राहणार असल्याचा इशारा दिला आहे. संबंधितानी जीर्ण व मोडकळीस आलेल्या इमारतींच्या दुरुस्तीसाठी पालिकेकडे रचनात्मक स्थैर्य प्रमाणपत्र घेण्यासाठी वास्तू विषारदांकडे प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन केले आहे.
नोटीसीनंतरही ईमारती ‘जैसे थे’
शहरातील 12 इमारतीच्या मालकांना पालिका प्रशासनाने 2013-14 मध्ये जीर्ण इमारत पाडण्याबाबत नोटीसा बजावल्या होत्या मात्र त्यानंतरही या इमारती ‘जैसे थे’ असल्याचे चित्र आहेत. विशेष म्हणजे अनेक इमारती रहदारीच्या रस्त्यावर आहेत शिवाय पावसाळ्यात मुसळधार पाऊस झाल्यास व इमारत कोसळून काही दुर्घटना इमारतीत वास्तव्या करणार्यांसह पादचार्यांच्या जिवाचे काही झाल्यास जबाबदार कोण? असा प्रश्न आहे़
पालिकेकडून केवळ नोटीस बजावण्याचे सोपस्कार
भुसावळ नगरपालिकेकडून पडक्या इमारतींच्या मालकांना केवळ नोटीस बजावून कर्तव्यपूर्ती केली जाते़ ज्या पडक्या इमारतींमध्ये नागरीक राहत आहेत, तेथे भाडेकरू व घरमालक दोघांना नोटीसा बजावण्यात येतात. घराचा काही भागच पडका असेल तर तेवढ्या भागापुरतीच नोटीस बजावली जाते. मुंबई प्रांतिक नगरपालिका अधिनियम 1949 मधील इमारतीसंबंधी अधिनियम 264 (1) नुसार ही नोटीस बजावली जाते. त्यात घराचा, इमारतीचा पडका भाग नोटीस मिळाल्यापासून सात दिवसांच्या आत पाडून टाकण्याचे किंवा दुरुस्ती करण्याबाबत बजावले जाते. अवघ्या आठवडाभराने पावसाळ्यास सुरुवात होईल़़़ अतिवृष्टी झाल्यास शहरातील पडक्या इमारती पडल्याशिवाय राहणार नाहीत़़़़ भर रस्त्यावर वा गल्ली भागातील या इमारती पडल्यानंतर पादचार्यांसह त्यात राहणार्यांच्या जिवीताला धोका झाल्यास जबाबदार कोण?असा प्रश्न आहे. दरम्यान, काही इमारतीत भाडेकरू सुमारे 30 वर्षांपासून अधिक रहिवासी करीत असल्याने घरमालक व भाडेकरूंमध्ये न्यायालयात केसेस सुरू आहेत. ताबा न सोडण्यासाठी भाडेकरूंही अद्यापही इमारतीत ठाण मांडले आहे.