भुसावळात पाणीपुरवठा ठप्प ; बंधार्‍यातील पाणी संपले

0

भुसावळ- हतनूर धरणातील आवर्तन सोडण्यास विलंब झाल्याने शहराच्या पाणीपुरवठ्यात कपात करण्यात आली असतानाच तापीच्या बंधार्‍यातील पाणी संपल्याने शहरवासीयांना ऐन हिवाळ्यात हंडाभर पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. पालिकेच्या साठवण बंधार्‍यांतील पाणी संपल्याने पालिकेची पाणी पुरवठा यंत्रणा ठप्प झाली आहे. एकीकडे पालिकेच्या बंधार्‍यातील पाणी संपले असताना दुसरीकडे रेल्वेच्या साठवण बंधार्‍यात चार दिवस पुरेल इतका साठा असल्याने रेल्वेनेही कर्मचारी वसाहतीत 50 टक्के पाण्यात कपात केली आहे. तातडीने आवर्तन न सुटल्यास त्याचा फटका रेल्वे स्थानकात गाड्यांमध्ये भरल्या जाणार्‍या पाण्यावर तसेच प्रवाशांना मिळणार्‍या पिण्याच्या पाण्यावर व रेल्वे वसाहतीतही बसणार आहे. रेल्वे प्रशासनाने चार दिवस पाणी मिळेल या पद्धत्तीने आता नियोजन केले आहे.