भुसावळात पारदर्शक धान्य वितरणासाठी दुकान निहाय समित्या गठीत व्हाव्यात

0

शिवसेना शहर प्रमुख बबलू बर्‍हाटे यांची प्रशासनाकडे मागणी

भुसावळ : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संचारबंदीच्या काळात रेशनधान्य बाबत अनेक तक्रारी समोर आल्या आहेत. धान्य पुरवठा पारदर्शक व्हावा आणि सार्वजनिक वितरण प्रणालीवर नियंत्रण ठेवले जावे यासाठी दुकान निहाय समित्या गठित करण्यात यावी, अशी मागणी भुसावळचे तहसीलदार दीपक धिवरे यांच्याकडे शिवसेनेचे शहर प्रमुख बबलू बर्‍हाटे यांनी केली आहे.

तात्पुरत्या समितीत शिवसैनिकांचा समावेश करावा
भुसावळातील 121 रेशन दुकानात मोफत तांदूळ तसेच इतर धान्य वितरण सुरळीत सुरू ठेवण्यासाठी तात्पुरती समिती गठीत करावी तसेच या समितीत प्रत्येक दुकान समितीत शिवसेनेच्या पदाधिकारी किंवा शिवसैनिकांची तात्पुरत्या नेमणूक करावी. या तात्पुरत्या समितीमुळे येणार्‍या तीन महिन्यांच्या धान्य वाटपात, सार्वजनिक वितरण प्रणालीवर अंकुश राहील, वितरण प्रणाली पारदर्शक होईल.

ग्राहकांच्या समस्या शिवसैनिक सोडवणार
ग्राहकांच्या तक्रारीचा निपटारा होईल, याप्रमाणेच गाव पातळीवरही तक्रारी दूर होतील. रेशन दुकानातून होणारा धान्यपुरवठा खरोखरच गोरगरीब जनतेपर्यंत होतो, की नाही, हे पाहण्याची जबाबदारी या समितीची राहील. ई-पॉश मशीनवर वृद्ध, गोरगरीब जनतेचे ठसे उमटत नाहीत. तक्रारी करूनही न्याय मिळत नसल्याचे लाभार्थ्यांमधून बोलले जात आहे, या तक्रारी लवकर सुटतील म्हणून ह्या वार्ड निहाय दुकान स्तरीय समित्या लवकर स्थापन कराव्यात, अशी मागणी बबलू बर्‍हाटे यांनी केली आहे.