भुसावळात पालिका कर्मचार्‍यांचे वेतन रखडले : शासन आदेशाला केराची टोपली

0

कर्मचारी आर्थिक अडचणीत : नगरपालिका वर्कर्स युनियनचा आंदोलनाचा ईशारा

भुसावळ- राज्याचे वित्त व अर्थमंत्री सुधीर मनगंटीवार यांनी राज्यातील सर्व नगरपालिका कर्मचार्‍यांचे वेतन वेळेवर करावे, असे आदेश नगरविकास विभागाला दिले असताना भुसावळ नगरपालिकेत मात्र या आदेशाची अंमलबजावणी होत नसल्याने पालिका प्रशासनाने शासनाच्या या आदेशाला केराची टोपली दाखवल्याचे आरोप पत्रकान्वये नगरपालिका वर्कर्स युनियनचे अध्यक्ष राजू खरारे यांनी केला आहे.

नगरविकास मंत्र्यांच्या आदेशाला केराची टोपली
भुसावळ नगरपालिकेतील सफाई कामगारांना वेळेवर वेतन मिळत नसल्याने त्यांना आर्थिक अडचणीचा सामना करावा लागतो. यासाठी नगरपालिका वर्कर्स युनियनने वारंवार आंदोलने करून प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे तसेच कर्मचार्‍यांच्या या मागणीची दखल घेेवून राज्याचे वित्त व अर्थमंत्री सुधीर मनगुंट्टीवार यांनी दखल घेत नगर विकास विभागाला आदेश देवून राज्यातील सर्व नगरपालिकेतील कर्मचार्‍यांना वेळेवर वेतन देण्याचे आदेश दिले आहेत तसेच आदेशाची अवहेलना केल्याचे आढळून आल्यास वेतनासंबधी अधिकारी व कर्मचार्‍यांवर कारवाई करण्यात येईल, असेही नमूद केले आहे. त्यानुसार भुसावळ नगरपालिकेतील कर्मचार्‍यांचे वेतन वेळेवर होणे अपेक्षीत आहे मात्र नगरपालिकेच्या माध्यमातून नगर विकास विभागाच्या आदेशाला केराची टोपली दाखवली असल्याचे दिसून येत आहे. यामुळे नाईलाजस्तव आंदोलनाचा मार्ग पत्करावा लागेल, असेही नगरपालिका वर्कर्स युनियनचे अध्यक्ष राजू खरारे यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळवले आहे.