नागरीकांमध्ये भीती गायीसह वासरावरही चढवला हल्ला
भुसावळ- शहरातील तापी नगरातील हिंदू हौसिंग सोसायटीत राहणार्या माजी सैनिक शिरीषकुमार सरोदे यांच्यावर सोमवारी सकाळी पिसाळलेल्या श्वानाने हल्ला केल्याने सरोदे हे गंभीर जखमी झाले आहेत. पिसाळलेल्या श्वानाने दोन्ही हातासह पोटावर चावा घेतला असून तापीनगर परीसरातील एका गायीसह वासरावरही हल्ला चढवण्यात आल्याने या परीसरातील नागरिकांमध्ये भीती पसरली आहे. हिंदू हौसिंग सोसायटीमधील माजी सैनिक शिरीषकुमार शंकर सरादे (60) हे घराबाहेर निघत असताना सोमवारी सकाळी साडेनऊ वाजेच्या दरम्यान पिसाळलेल्या श्वानाने हल्ला चढवत त्यांना जखमी केले. यासोबत परिसरातील एक गाय, वासरू व अन्य दोन तीन जणांवरही या कुत्र्याने हल्ला चढवला. दरम्यान जखमी अवस्थेतील सरोदे यांना पालिकेच्या संत गाडगेबाबा रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. श्वानदंशावरील रेबीज लस व अन्य उपचार करुन त्यांना सोडण्यात आले मात्र या घटनेमुळे तापी नगरसह परीसरात खळबळ उडाली आहे. शहरातील सर्वच भागांमध्ये पिसाळलेल्या व भटक्या कुत्र्यांचे प्रमाण वाढले आहे. पालिका प्रशासनाकडून मात्र या मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त होत नसल्याने संताप व्यक्त होत आहे.